दाल रोटी खावो... प्रभू के गुण गावो... नगर जिल्ह्यात ‘या’ गावातील स्थिती

विनायक दरंदले
Monday, 20 July 2020

सोनईत कोरोनाचे कहर मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने गावाला हॉटस्पॉट जाहीर केले आहे.

सोनई (अहमदनगर) : सोनईत कोरोनाचे कहर मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने गावाला हॉटस्पॉट जाहीर केले आहे. १२ दिवसापासून पुर्ण गाव बंद असल्याने ग्रामस्थांना भाजीपाल्या अभावी दाळभात व झुणका भाकर खावी लागत आहे.

औरंगाबाद येथील एका कंपनीत काम करत असलेली व्यक्ती मुलाच्या विवाहानिमित्त सोनईत आली होती. या व्यक्तीचे ६ जुलै रोजी निधन झाले. त्या गल्लीत हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची चर्चा झाल्याने स्थानिक प्रशासनाने ८ जुलैपासून गाव बंद केले. दोन दिवसाने निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील ११ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्यात आणि लगेचच गाव हॉटस्पॉट जाहीर केले होते. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रशासनाने अत्यावश्यक सेवासह सर्व गाव बंद केल्याने गावाची मोठी पंचायत झाली आहे. दुध, भाजीपाला, किराणासह पिठाची चकी बंद असल्याने आता खायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन मोठ्या गल्लीचा परीसर पुर्ण सील केला असल्याने त्या भागात रोजच दाळभात किंवा पिठलंभात खाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. बाहेर फिरायला जाता येत नसल्याने अनेकांनी घरात गुरुचरित्र, नवनाथ, स्वामीचरित्र, दुर्गासप्तशती पारायण सुरु केले आहे.

अनेकांवर 'दाल रोटी खावो.. प्रभू के गुण गावो..' म्हणण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.  १३ दिवसापासून गाव कडकडीत बंद असून गावात रोज रुग्णवाहिका सायरन वाजवत येते आणि संपर्कातील व्यक्तींना घेवून जात आहे. गावात आतापर्यंत ३९ तर नगरला स्वतंत्र तपासणीत आढळलेले दोन असे एक्केचाळीस कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. धाकधूक वाढल्याने घरोघर चहा कॉफी हद्दपार होवून विविध प्रकारचे काढे शिजू लागले आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Corona hotspot from sonai village closed for 12 days