प्रशासनाच्या चलता है... भूमिकेमुळेच कर्जतमध्ये कोरोनाचा शिरकाव

दत्ता उकिरडे
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबई- पुणेसारख्या रेड झोनमधून हजारो जण कोरोनाच्या भीतीने गावाकडे आले आहेत. यात बहुसंख्य लोकांनी वैद्यकीय तपासणी केलेली नाही. तसेच गावात आल्यावर क्वारंटाईनच्या भीतीने बाहेरून आल्याची माहिती लपवली असून बाहेरून आलेल्या सर्वं लोकांची माहिती घेण्यात व त्यांना क्वारंटाईन करण्यात ग्रामपंचायत पातळीवरील यंत्रणा व तालुका प्रशासन कमी पडले आहे. ग्रामसेवक काय करतात, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राशीन : कर्जत तालुक्यातील प्रशासनाचा ढिसाळ कारभार, कोरोनाच्या बाबतीतील प्रचंड हलगर्जीपणा, गावपातळीवरील राजकारण, क्वारंटाईनमध्ये करण्यात येणारी वशिलेबाजी आणि जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार यामुळेच राशीनमध्ये (ता.कर्जत) कोरोना आला आहे.

१६ मे रोजी मृत महिलेची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून तेथेच उपचार केले असते तर कर्जत तालुक्यातील कोरोनाच्या प्रवेशास अटकाव बसला असता. आणि त्या महिलेचे प्राणही वाचले असते. मात्र, दुर्दैवाने तसे घडले नाही. 

ग्रामसेवक सरपंच काय करतात

मुंबई- पुणेसारख्या रेड झोनमधून हजारो जण कोरोनाच्या भीतीने गावाकडे आले आहेत. यात बहुसंख्य लोकांनी वैद्यकीय तपासणी केलेली नाही. तसेच गावात आल्यावर क्वारंटाईनच्या भीतीने बाहेरून आल्याची माहिती लपवली असून बाहेरून आलेल्या सर्वं लोकांची माहिती घेण्यात व त्यांना क्वारंटाईन करण्यात ग्रामपंचायत पातळीवरील यंत्रणा व तालुका प्रशासन कमी पडले आहे. ग्रामसेवक काय करतात, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

चोरून राहतात वाड्या-वस्त्यांवर

पोलिसांनीही जिल्ह्याच्या हद्दीवरून प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली नाही. त्यातील लोकांचा वैद्यकीय तपासणी अहवाल मागितला नाही. पर्यायाने या लोकांच्या माध्यमातून कोरोनाने कर्जत तालुक्यातील गावे व  वाड्या वस्त्यांवर प्रवेश मिळवला आहे. तो अनेक निरपराध लोकांच्या जीवाशी खेळणार असल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी येथे सक्षमपणे प्रशासन हाताळणाऱ्या अधिकाऱ्याची गरज भासत आहे.

दरम्यान मुंबई(वाशी) येथून राशीनला पाहुण्याकडे आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर राशीनमधील तिच्या बारा नातेवाईकांना तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या पाच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राशीन येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

ती वसाहत सील

मृत महिला राहिलेल्या वसाहतीला सील करण्यात आले आहे. धडक कृती दलाच्या पथकाने राशीनच्या प्रत्येक रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

गावपातळीवर नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस अधिकारी हे संबंधित गावात राहत नाहीत. केवळ मिटिंगाचे कागदपत्र रंगवतात. त्यामुळे अशा कठीणप्रसंगी कोणाचा कोणावरच अंकुश राहत नाही. पर्यायाने कारभार ढिसाळ होतोच याला राशीनही अपवाद राहिलेले नाही. राशीन ग्रामपंचायतीने वारंवार मिटिंगा घेऊन बाजारपेठेचे नियोजन केले. मात्र बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आणि चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात अपयश आल्याने या मीटिंगा केवळ फार्स ठरल्या.
 

राशीनकरांच्या या आहेत मागण्या
सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने, ग्रामविकास अधिकारी अनिल भोईटे, वैद्यकीय अधिकारी दिलीप व्हरकटे, तलाठी प्रशांत गाढवे यांची नेमणूक राशीनला असल्याने त्यांना तेथे राहण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्याव्यात.

तहसीलदार बिनकामाचे

तहसीलदार छगन वाघ यांचा कारभार पाहता त्यांच्या जागेवर कोरोनाच्या उपाययोजनांसाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी. मृत महिलेच्या नातेवाईकांकडे कामाला असणाऱ्या बिहारी कामगारांनाही क्वारंटाईन करावे, अशी मागणी राशीन ग्रामस्थांनी केली आहे. 

सिव्हिलमध्ये स्वॅब का घेतला नाही

 १६ मे रोजी मृत महिलेला जिल्हा रुग्णालयात नेऊनही तिची तपासणी का केली नाही याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in Karjat due to inefficiency of administration