कर्जत तालुक्यात शिरला कोरोना...मुंबईच्या महिलेने सुनेच्या माहेराला दिला वानोळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

मुंबईहून संबंधित महिला खासगी वाहनाने आपल्या सुनेसोबत आली होती. तीच्या सुनेच्या घरी, तसेच दोन दिवस राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्यात आलं होतं. 

कर्जत/राशीन : शेजारील करमाळा, जामखेड, बारामती, दौंड तालुक्यात कोरोनाने कहर केला होता. परंतु कर्जत तालुक्यात आतापर्यंत एकही रूग्ण आढळून आला नव्हता. परंतु मुंबईहून आलेल्या महिलेने सुनेच्या माहेराला म्हणजे कर्जत तालुक्याला कोरोनाचा वानोळा दिला आहे.

मुंबईवरून (वाशी) सुनेसोबत तिच्या माहेरी राशीनला ती वृद्धा आली होती. त्यामुळे विलगीकरण कक्षात ठेवले होते. परंतु या महिलेचा उपचारासाठी नगरला जात असताना रुग्णवाहिकेत कोरोनानेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले,तिच्या स्वॅबचा अहवाल सकारात्मक आला असल्याने राशीनसह परिसराचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - नगरच्या रिक्षावाल्याचे कुटुंबच बाधित

मुंबईहून संबंधित महिला खासगी वाहनाने आपल्या सुनेसोबत आली होती. तीच्या सुनेच्या घरी, तसेच दोन दिवस राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर १६ मे ला तपासणीसाठी नगर जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर  त्यांच्या नातेवाईकांच्या घरी ही महिला राहिली होती. या महिलेच्या संपर्कात ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तिचे नातेवाईक, नातेवाईकांकडे असलेले कामगार, आणि राशीनमधील एक खासगी रुग्णालयातील डॉक्टर आले आहेत.

राशीन बंद

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी उद्या राशीन बंद ठेवण्यासोबत संबंधित महिला वास्तव्यास असलेला भाग सील करण्यास सांगितले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी म्हणून पुढील तपासणीसाठी कर्जतला नेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

नुकतेच जामखेड कोरोनामुक्त झाले असतानाच कर्जत तालुक्यातील राशीनला कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा बळी गेल्याने संपूर्ण कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. यावर प्रशासनाने कठोर आणि तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

जिल्हा रुग्णालय जबाबदार
१६ मे रोजी संबंधित महिला तपासणीसाठी गेली असताना तिची तपासणी न करता औषधे घेऊन होम क्वारंटाइन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या महिलेस त्याच दिवशी तपासणी करून उपचारासाठी दाखल केले असते तर संबंधित महिलेशी अनेकांचे संपर्क टळले असते. कदाचित तिचे प्राणही वाचू शकले असते.

संबंधित महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळेच राशीनला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होते. मृत्यूनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

डॉ. संदीप पुंड, तालुका वैद्यकीय अधिकारी, कर्जत
 

राशीनमध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. ती महिला कोणाच्या संपर्कात आली होती. त्याचे माहिती घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.

- संजय सातव, पोलिस उपाधिक्षक, कर्जत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in Karjat taluka