धक्कादायक! श्रीरामपूर तालुक्यात आणखी सात कोरोनाबाधित रुग्ण

गौरव साळुंके
Saturday, 18 July 2020

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा नव्याने सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात शहरातील दोघांसह मोरगे वस्ती, अशोकनगर, बेलापूर खुर्द, भोकर व गळनिंब परिसरातील प्रत्येकी एक अशा सात रुग्णांचा त्यात समावेश आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा नव्याने सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात शहरातील दोघांसह मोरगे वस्ती, अशोकनगर, बेलापूर खुर्द, भोकर व गळनिंब परिसरातील प्रत्येकी एक अशा सात रुग्णांचा त्यात समावेश आहे.
भोकर येथील कोरोनाबाधित ठाणे परिसरातुन आला असुन उर्वरीत सहा कोरोनाबाधित स्थानिक नागरीक आहे. बेलापूर खुर्द येथील एक वृध्द महिला, शहरातील एक वृध्द पुरुष यांच्यासह आणखी सहा स्थानिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील पाच जणांनाचे सरकारी तर दोघांचे अहवाल खाजगी प्रयोग शाळेतून रात्री उशिरा प्राप्त झाले. बाधीत रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरु आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गुरुवारी (ता.१६) रात्री उशीरा शहर परिसरात एकाचवेळी २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाचा भडका उडाला. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा नव्याने सात स्थानिक रुग्ण आढळल्याने शहरात कोरोनाचा समुह संसर्ग झाल्याचे स्पष्ट होते. मागील काही दिवसांत स्थानिक नागरीकांना कोरोनाची बाधा झाल्याने धोका वाढला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने आता शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७५ वर पोहचली आहे. शहरात गुरुवारी (ता. १६) रात्री आढळलेले २१ कोरोनाबाधित स्थानिक असुन त्याचे अहवाल प्राप्त होईपर्यंत आरोग्य विभागाने त्यांना होमक्वारंटाईन केले होते. त्यांच्या संपर्कातील सात जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. तर नव्याने आढळलेल्या सात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे तीघांना जीव गमवावा लागला असुन सध्या येथील संतलुक रुग्णालयात अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. संशयीत नागरिकांना वडाळा महादेव येथील होमिओपॅथी महाविद्यालय तसेच सिरसगाव येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. तसेच तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात स्राव घेतले जातात.
तरी देखील दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा व गुरुवारी (ता. १६) आढळून आलेले रुग्ण स्थानिक आहे. त्यांनी प्रवास कोठेही केल्याची कुठलीही पाश्वभुमी नाही. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा समुह संसर्ग झाल्याचे दिसुन येते.
सध्या कोरोनाचा धोका वाढत असला तरी शहरातील गर्दी कमी होत नाही. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. त्यात पोलिसांचा धाक कमी झाल्याने विनाकारण फिरण्याची संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लघंन होत असुन अनेकजण विना मास्कचे फिरतात. शहरातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याने येत्या काळात कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अशी आहेत श्रीरामपूरची स्थिती :
कोरोनाबाधित : ७५
निगेटिव्ह केसेस : २९४
संस्थात्मक क्वाॅरंटाईन : २३
अहवालाची प्रतिक्षा : १४५
उपचार घेणारे रुग्ण : ८
सारी सदृश्य : १५
बरे झालेले : ६३
मृत्यू : ३
कोरोना सदृश्य मृत्यू :१

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak in Shrirampur taluka adds seven new patients