बिग ब्रेकिंग... एकाच व्यक्तीचे सहा तासात कोरोना टेस्टचे दोन वेगवेगळे रिपोर्ट

संजय आ. काटे
Friday, 17 July 2020

१३ जूलैला घोगरगाव (ता. श्रीगोंदे) येथील एका व्यक्तीचा दुपारी ४ वाजता सरकारी यंत्रणेने घशाचा स्त्राव घेतला. तो व्यक्ती गंभीर आजारी असल्याने त्याला शस्त्रक्रिया करायची होती. सरकारी यंत्रणेचा अहवाल येण्यास उशिर लागत असल्याने खाजगी यंत्रणेत पुन्हा रात्री १० वाजता स्त्राव घेतला.

श्रीगोंदे (अहमदनगर) : १३ जूलैला घोगरगाव (ता. श्रीगोंदे) येथील एका व्यक्तीचा दुपारी ४ वाजता सरकारी यंत्रणेने घशाचा स्त्राव घेतला. तो व्यक्ती गंभीर आजारी असल्याने त्याला शस्त्रक्रिया करायची होती. सरकारी यंत्रणेचा अहवाल येण्यास उशिर लागत असल्याने खाजगी यंत्रणेत पुन्हा रात्री १० वाजता स्त्राव घेतला. खाजगीतील तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि गुरुवारी त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया झाली. मात्र काल रात्रीच सरकारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ झाला. घोगरगाव सील करण्याची प्रक्रिया सुरु आहे, मात्र त्या व्यक्तीचा खरा रिपोर्ट कोणता? असा प्रश्‍न केला जाऊ लागला आहे.

घोगरगाव येथील ७२ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचा सरकारी अहवाल तीन दिवसांनी येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाला. सदर व्यक्तीचा स्त्राव नगर येथे १३ जूलैला घेण्यात आला होता. मात्र ती व्यक्ती एका आजाराशी झुंजत असल्याने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यातच सरकारी यंत्रणेचा अहवाल येण्यास उशिर लागणार हे गृहित धरुन शहराजवळील एका अद्यावायत रुग्णालयातील लॅबमध्ये (कोरोना टेस्टसाठी सरकारमान्य) त्या व्यक्तीची टेस्ट झाली. दुसऱ्या अहवाल निगेटिव्ह आला आणि काल त्या व्यक्तीची शस्त्रक्रिया झाली. मात्र रात्री सरकारी अहवाल आला आणि तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे यंत्रणेने लगेच घोगरगाव सील करण्याची प्रक्रिया सुरु केली. ग्रामपंचायतीचे तसे पत्र सरपंचांचे लगेच काढून सोशल मिडीयावर व्हायरल झाले. मात्र खरा गोंधळ तर पुढे झाला. ती व्यक्ती पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह असल्याचा खाजगीचा रिपोर्ट घरातील लोकांनी लगेच पाठविला. त्यामुळे सहा तासांच्या अंतराने केलेल्या दोन वेगळ्या ठिकाणच्या टेस्ट वेगळ्या कशा येऊ शकतात. यावरुन गोंधळ सुरु झाला. मात्र तरीही घोगरगाव सील करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरु आहे.

नेमका कोणता अहवाल खरा?
खाजगी म्हणते तो व्यक्ती निगेटिव्ह तर सरकारी यंत्रणेचे तो पाॅझिटिव्ह ठरविला आहे.  सहा तासांचे अंतर असले तरी उशिराची टेस्ट सरकारी आहे. शिवाय आता त्या व्यक्तीची शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यामुळे गोंधळ स्वाभाविक आहे.

श्रीगोंदे येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, खाजगी ठिकाणचा त्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समजले. मात्र त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. त्याबद्दल वरिष्ठांना कल्पना दिली आहे. सरकारी यंत्रणेचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह असून त्यानूसार पुढची खबरदारी घेण्याच्या सूचना वरिष्ठांच्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of a person in Ghogargaon Shrigonde taluka is positive