लक्षणे जाणवत नसणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये जावे

Corona review of Ahmednagar district by Guardian Minister Hasan Mushrif
Corona review of Ahmednagar district by Guardian Minister Hasan Mushrif

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

तालुकापातळीवरील आरोग्य यंत्रणेला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घ्यावेत. त्यामुळे आवश्यक रुग्णांना कोविड ह़ॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील. पुढील शंभर दिवसांसाठी नियोजन करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी परिपूर्ण आराखड़ा तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ व महसूलमंत्री थोरात यांनी कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात आपण चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे बाधित संख्या वाढते आहे. मात्र, बाधित रुग्ण शोधण्यासाठी ही मोहिम अधिक गतीमान करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या यापुढील काळात वाढवावी. अनेक रुग्णांच्या बेडस मिळत नसल्याबाबतच्या तक्रारींचा उल्लेख करुन पालकमंत्री म्हणाले, बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्षणे जाणवणार्‍या व ऑक्सीजन अथवा व्हेंटिलेटरची आवश्यकता असणार्‍या रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील.

तालुकास्तरावरील वैद्यकीय सुविधा बळकट करण्यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांचे म्हणणे मांडले. त्यावर, या वैद्यकीय यंत्रणांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालय अथवा तालुकास्तरीय यंत्रणा अहोरात्र या कोरोना संकटाशी झटत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी या सुविधा आवश्यक आहेत आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्या उपलब्ध करुन दिल्या जातील.

जिल्ह्यात पुरेसा औषधपुरवठा होत असून गरज भासल्यास अधिक औषधसाठा उपलब्ध करुन दिला जाईल. रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड्सची संख्या, ऑक्सीजन सिलींडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णांच्या मृत्यू रोखण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाच्या सोबत आहेत. सर्वंकष नियोजन करुन आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याची सूचना त्यांनी केली.

आमदार पवार यांनी काही रुग्णालये रुग्णांकडून जास्त शुल्क आकारत असल्याच्या व त्याची पावती देत नसल्याची तक्रार केली. आमदार जगताप यांनी महापालिका क्षेत्रासाठी अधिक आरोग्य कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. आमदार डॉ. लहामटे यांनी दुर्गम भागात अधिक आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी केली.

आमदार राजळे यांनी तालुकास्तरावर ऑक्सीजन पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. आ. कानडे यांनी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयासाठी सुविधा वाढविण्याची मागणी केली. आ. काळे यांनीही कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण केल्या तर येथील जिल्हा रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी होईल, असे सांगितले. आ. पाचपुते यांनी प्रशासन अधिक सतर्कतेने काम करीत आहे मात्र, यापुढील काळात तालुका पातळीवरही ऑक्सीजन बेड्स उपलब्ध असतील, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com