esakal | संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर; २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित!
sakal

बोलून बातमी शोधा

corona

संगमनेर तालुक्यात २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित!

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यभरात कोविड रुग्णसंख्येत घट होत असली, तरी संगमनेर तालुका अद्यापही बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात आघाडीवर आहे. मागील दहा दिवसांपासून तालुक्यात शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात चार ठिकाणी, तसेच तालुक्यातील २७ गावांत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.


सुमारे दोन वर्षांपासून कोविड महामारीने जनजीवन विस्कळित आहे. शासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण सुरू आहे. लसीकरणानंतर नागरिकांमध्ये वाढलेली बेफिकिरी व सणासुदीच्या काळात पुन्हा नव्या जोमाने, मागची कसर भरून काढण्यासाठी सुरू झालेली कापड, किराणा व इतर खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी वाढते आहे. कोविडची भीती कमी झाल्याने दुकानदारांसह ग्राहकांकडून नियमांची पायमल्ली करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. दुकानांसमोर सॅनिटायझर व मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे लावलेले फलक केवळ औपचारिकता म्हणून लावले गेले आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांनो, सोयाबीन विक्रीची घाई करू नका! व्यापाऱ्यांचे आवाहन


गेल्या काही दिवसांतील विवाह समारंभ, साखरपुडे, वराती, अंत्यविधी, तेरावे आदी सार्वजनिक उपक्रमांना गर्दी वाढल्याने, अनेक गावांतील कुटुंबांना कोविडची लागण झाली आहे. त्यामुळे तहसीलदार अमोल निकम यांनी संगमनेर शहरातील गणेशनगर, जनतानगर व भरतनगर येथील काही भाग २३ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला होता. तालुक्यातील पिंप्री- लौकी- अजमपूर, खळी, जाखुरी, पानोडी, हजारवाडी, तळेगाव दिघे, मनोली, घुलेवाडी, कनोली, शेडगाव, पिंपरणे, निमगाव बुद्रुक, निमगाव जाळी, आश्वी खुर्द, राजापूर, सायखिंडी, गुंजाळवाडी, वनकुटे, चिकणी, आश्वी बुद्रुक, खांडगाव, वडगाव लांडगा, मांडवे बुद्रुक, चंदनापुरी, कोल्हेवाडी, चिंचपूर बुद्रुक यातील काही गावे पूर्ण, तर काही गावांतील वाड्या-वस्त्या तीन ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत.

हेही वाचा: डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांनी काय खावे? आहारतज्ञ सांगतात की..


कोविड सेंटरचा रुग्णांना दिलासा

हॉटेले, उपाहारगृहे, दुकाने जोमाने सुरू असल्याने संगमनेर शहरात रोज गर्दीचा उच्चांक होत आहे. मागील दहा दिवसांत कोविडच्या आकडेवारीने शंभरची संख्या सातत्याने पार केली आहे. तालुक्यातील सहा ते सात कोविड केअर सेंटर अद्यापही कार्यरत असल्याने रुग्णांना थोडा दिलासा मिळत आहे.

loading image
go to top