
आजची ड्रायरन चाचणी यशस्वी झाली. आता लवकरच कोरोना लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
नगर : जिल्हा आरोग्य प्रशासनाने आज कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्रायरन) घेतली. महापालिकेत झालेल्या ड्रायरनची पाहणी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी, तर ग्रामीण भागातील वाळकी येथील ड्रायरनची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केली.
आजची ड्रायरन चाचणी यशस्वी झाली. आता लवकरच कोरोना लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील तीन ठिकाणी आज लसीकरणाची सरावफेरी अर्थात ड्रायरन झाली. त्यात सुरवातीच्या टप्प्यात लस कशी देणार, याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महापालिकेच्या तोफखाना येथील नागरी आरोग्य केंद्रात पाहणी केली.
वाळकी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी पाहणी केली. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने लसीकरणाची सरावफेरी यशस्वीरित्या पूर्ण केली. लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.
तोफखाना नागरी आरोग्य केंद्रात महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. नलिनी थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका गोरे, डॉ. सुजीत सैंदाणे, मंगला माटे, प्रतिमा राऊत, पूनम सूर्यवंशी, निर्मला गायकवाड आदींनी संयोजन केले.
हेही वाचा - सुरत-हैदराबाद रस्त्यामुळे शेतकरी येणार रस्त्यावर
वाळकी ग्रामीण आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले. डॉ. अनिल ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यात डॉ. नंदा वाघ, डॉ. मनीष बडे, डॉ. सुवर्णा कांबळे, डॉ. व्ही. पी. शेजाळ, डॉ. रुपाली काळे, शेख नसरीन यांनी सूचनांचे पालन करीत हा ड्रायरन पार पडला.
असे होणार लसीकरण
आरोग्य केंद्रात आल्यानंतर नागरिकांची ओळखपत्र पाहणी, त्यांच्या शरीराचे तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात येईल. नंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसविले जाईल. तेथून त्यांना लसीकरणाच्या कक्षात नेले जाईल. तेथे कोविन ऍपवर त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर लसीकरण होईल. लसीकरणानंतर किमान अर्धा तास विश्रांती कक्षात थांबवले जाणार आहे.