अभिमान तर वाटणारच ः नगरकराने बनवली सिरमची कोरोना लस, पंतप्रधानांनी केलं कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

ही लस बनविण्यासाठी नगरच्या वैज्ञानिकाचे मोठे योगदान आहे. मूळ पारनेरकर असलेल्या या वैज्ञानिकाच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांचे कौतुक केले आहे.
 

नगर : कोरोना लसीबाबत सर्व जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याच्या सिरम इन्सिट्यूटने लसीबाबत भारतालाच नव्हे तर जगालाही मोठी खुशखबर दिली आहे. ही लस बनविण्यासाठी नगरच्या वैज्ञानिकाचे मोठे योगदान आहे. मूळ पारनेरकर असलेल्या या वैज्ञानिकाच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन कोरोनावरील लसीची माहिती घेतली. मूळचे पारनेर तालुक्‍यातील वैज्ञानिक डॉ. उमेश शालीग्राम यांचे या लसनिर्मितीत मोठे योगदान आहे.

 पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. डॉ. शालीग्राम हे अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. तेथील शास्त्रज्ञांच्या टीमसोबत त्यांनी हे मोलाचे काम केले आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख संचालक आदर पुनावाला व डॉ. शालीग्राम यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोना लसीबाबत माहिती दिली. डॉ. शालीग्राम त्यांनी अहमदनगर महाविद्यालयात चार महिने प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी औरंगाबादमध्येही एका खासगी कंपनीतही सेवा दिलेली आहे. 

कोरोना लसीसाठी डॉ. शालीग्राम देत असलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. एन. आर. सोमवंशी, डॉ. ए. व्ही. नागवडे, डॉ. रझाक सय्यद, डॉ. बी. एम. गायकर, ए. वाय. बळीद आदी उपस्थित होते.

महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय शालीग्राम यांचे ते थोरले बंधू आहेत. डॉ. बार्नबस म्हणाले, की अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. शालीग्राम हे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महत्त्वाच्या लस उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचा अभिमान वाटतो. डॉ. शालीग्राम व त्यांच्या टीमला यश मिळून लवकरच कोरोना निर्मुलन होईल. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccine made by a scientist from Ahmednagar