रॅपिड टेस्टचे किट संपले; जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचीच कोरोना तपासणी लांबली

दौलत झावरे
Thursday, 20 August 2020

जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित निघत असल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी.

नगर : जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित निघत असल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत असल्याने, प्रशासनाने रॅपिड तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र, रॅपिड टेस्टसाठी लागणारी किट संपल्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी आता रखडली आहे.

जिल्हा परिषदेतील तीन अधिकाऱ्यांसह 17 कर्मचारी कोरोनाबाधित निघाले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यांत एक अधिकारी व एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मागील महिन्यापासूनच जिल्हा परिषदेतील कर्मचारी कोरोनाबाधित निघत असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे यांनी केली होती.

त्यांच्या मागणीचा प्रशासनाने त्या वेळी गांभीर्याने विचार केला नाही. त्यानंतर एकामागून एक जिल्हा परिषद कर्मचारी कोरोनाबाधित सापडू लागल्यानंतर प्रशासनाने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती.

त्याच वेळी एका अधिकाऱ्याचा व कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे प्रशासनाने सर्वांची तपासणी करण्याबाबत जिल्हा रुग्णालयाशी पत्रव्यवहार करून तसे साकडे घातले होते. जिल्हा प्रशासनाकडून तपासणीला हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, ऐन वेळी रॅपिड तपासणीची किट संपल्यामुळे तपासणी रखडली आहे. किट आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या तपासणीबाबत विचार केला जाणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus test of Nagar Zilla Parishad employees delayed