esakal | कान्हूरपठार, निघोजसह पाच गावेच बनली वॉरिअर्स

बोलून बातमी शोधा

कान्हूरपठार मदत केंद्र
कान्हूरपठार, निघोजसह पाच गावेच बनली वॉरिअर्स
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

टाकळी ढोकेश्‍वर ः पारनेर तालुक्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामस्थांच्या पुढाकारातून कोविड सेंटर सुरू करण्यास कान्हूर पठार, कर्जुले हर्या, निघोज, शिरापूर, चोंभूत ही गावे सरसावली आहेत.

तालुक्‍यात आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवणी येथे अकराशे बेडचे शरदचंद्र पवार कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. खंडोबा देवस्थान, कर्जुले हर्या येथील मातोश्री रुग्णालयात शासनामार्फत कोविड सेंटर चालविण्यात येत आहे. मात्र, रुग्णवाढीचा वेग पाहता, गावांनी पुढाकार घेण्याची गरज ओळखून, कान्हूर पठार येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ऍड. आझाद ठुबे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

शिरापूर येथे लोकवर्गणीतून 50 बेडचे सेंटर सुरू होणार आहे. त्यातील 25 बेड ऑक्‍सिजन सुविधायुक्त असतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर उचाळे यांनी दिली.

चोंभूत येथेही उद्योजक सुनील शेळके यांच्या पुढाकारातून 10 बेडचे सुसज्ज कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. कर्जुले हर्या येथे ग्रामस्थांनी, तर निघोज येथे सचिन वराळ यांनी कोविड सेंटरसाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच सेंटर सुरू होणार आहेत.

"गाव वाचवू या, कोविड हद्दपार करू या' या सकारात्मक मोहिमेत शिरापूर, कान्हूर पठार, चोंभूत आदी गावे सहभागी झाली आहेत. तालुक्‍यातील इतरही गावांनी या गावांचा आदर्श घ्यावा.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

लोकवर्गणी, सामाजिक संस्था, सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड सेंटर सुरू केले आहे. प्रशासनावरील ताण या माध्यमातून कमी होईल. सर्वांनी एकत्र येऊन कोरोना हद्दपार करावा.

- ऍड. आझाद ठुबे, माजी जिल्हा परिषद सदस्य

कोविड रुग्णांना बेड मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे गावाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, हे ओळखून ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून कोविड सेंटर सुरू करणार आहोत.

- मधुकर उचाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य

बातमीदार - सनी सोनावळे