नगर महापालिकेचा कोरोनायोद्धा धारातिर्थी...शासन देणार इतक्या लाखांची मदत

अमित आवारी
शुक्रवार, 31 जुलै 2020

या बैठकीत महापालिका कर्मचाऱ्यांची वेळेवर कोरोनाविषयक वैद्यकीय तपासणी न झाल्याने रुग्णसंख्या वाढत आहे, असा आरोप अनंत लोखंडे यांनी केला.

नगर ः नगर महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. ही घटना समजताच नगर महापालिका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर व महापालिका आयुक्‍तांशी तातडीने बैठक घेतली.

महापालिकेच्या प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तीन-चार दिवसांत करून महापालिका आयुक्‍तांना अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्‍तांनी दिल्या आहेत. तसेच मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला शासनाच्या सुरक्षा कवच विमा योजनेतून मदत देण्यात येणार आहे. 

महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील एक कर्मचारी 12 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दोनच दिवसांत त्याची तब्बेत अधिकच बिघडली. त्यामुळे अधिक उपचारासाठी त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज या कर्मचाऱ्याचे निधन झाले. या कर्मचाऱ्याच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन मुलगे आहेत. 

कर्मचाऱ्याच्या निधनाची माहिती मिळताच महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याशी संपर्क साधला. महापौरांनी तातडीने बैठकीचे आयोजन केले.

हेही वाचा - हे शहर जनावरांचे...आयुक्तांनी काढला हा आदेश

या बैठकीत महापालिका कर्मचाऱ्यांची वेळेवर कोरोनाविषयक वैद्यकीय तपासणी न झाल्याने रुग्णसंख्या वाढत आहे, असा आरोप अनंत लोखंडे यांनी केला. आयुक्‍त मायकलवार यांनी मी दिलेल्या आदेशांचे पालन महापालिका अधिकारी व कर्मचारी योग्य प्रकारे करत नसल्याचे सांगत हतबलता दर्शविली.

महापौर वाकळे यांनी महापालिका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू होणे, ही गंभीर बाब असल्याचे सांगत तातडीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयुक्‍तांनी चारही प्रभाग समिती अधिकाऱ्यांना सर्व महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या तीन ते चार दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे समजते. 

यावेळी अनंत लोखंडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. कोरोनाने मृत झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या सुरक्षा कवच विमा योजनेतून 50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एका व्यक्‍तीला महापालिकेच्या सेवेत घेण्यात येणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले. 

मंगळवारी शोकसभा 
महापालिकेला सलग तीन दिवस सुटी असल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी (ता. 4) शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला महापौर, उपमहापौर, आयुक्‍त यांच्यासह महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली. 

-संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Yodha Dharatirthi of the Municipal Corporation