
'नेहरू मार्केटची इमारत अतिशय चांगली होती. केवळ दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र, महापालिकेने ती पाडून टाकली. पाडकामासाठी महापालिकेला आठवडा लागला.
अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला एमआरआय सेंटर चालविण्यासाठी तीन कोटींचा निधी दिला. त्यातून महापालिकेने 10 वर्षे जुने व अन्य ठिकाणी वापरलेले मशीन खरेदी करण्याचा घाट घातला. हे मशीन चालविण्यासाठी महापालिकेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. त्यामुळे ते बसविण्यापेक्षा या निधीतून महापालिकेने चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केट उभारावे, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
ते म्हणाले, 'नेहरू मार्केटची इमारत अतिशय चांगली होती. केवळ दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र, महापालिकेने ती पाडून टाकली. पाडकामासाठी महापालिकेला आठवडा लागला. इमारत एवढी मजबूत असतानाही ती का पाडली, याचे उत्तर महापालिका अधिकाऱ्यांनी द्यायला हवे. ही जागा केवळ 11 हजार चौरस फुटांची आहे. तत्कालीन नगररचनाकारांनी बेल्टिंग पद्धतीने जागेचे दर ठरविण्याचे निश्चित केले. ही बाब चुकीची होती. बेल्टिंग पद्धतीमुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते. त्यामुळे त्याविरोधात आम्ही आवाज उठविला होता. महापालिकेने ही इमारत स्वतः बांधून उत्पन्नाचे नवीन साधन तयार करावे.'
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असताना, 'एमआरआय' मशीनसाठी जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. महापालिकेला हा निधी देऊन 'एमआरआय' सेंटर चालविण्यास सांगितले. महापालिकेने 10 वर्षे जुने व अन्य ठिकाणी वापरलेले 'एमआरआय' मशीन खरेदी केले. ते बसविल्यास महापालिकेला उत्पन्न मिळण्याऐवजी खर्च वाढणार आहे. त्यामुळे स्थायी समितीनेही हे मशीन बसविण्यास परवानगी दिलेली नाही.
महापालिकेला ते चालविणे परवडणार नाही. त्यामुळे महापालिकेने जिल्हा नियोजन समितीचा तीन कोटी रुपयांचा निधी नेहरू मार्केट बांधण्यासाठी वापरावा. महापालिकेने स्वतः नेहरू मार्केट बांधले, तर गाळ्यांच्या बुकिंगसाठी नागरिक पुढे येतील. त्या रकमेतून इमारत सहज उभी राहील,' असा विश्वास बोराटे यांनी व्यक्त केला.