esakal | जाधव खून प्रकरणात सातजणांना जन्मठेप, लाखाचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Court convicts seven accused in Jadhav murder case

मुख्य आरोपी शेटे याने जुन्या वादातून हिंमत जाधव यांच्या खुनाची सुपारी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे, आजिनाथ ठोंबरे यांना दिली होती.

जाधव खून प्रकरणात सातजणांना जन्मठेप, लाखाचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : वळण पिंप्री (ता. राहुरी) येथील हिंमत जाधव यांच्या खुनाबद्दल जिल्हा सत्र न्यायालयाने आज मुख्य आरोपी राजू शेटे याच्यासह सात जणांना दोषी ठरवीत जन्मठेप व एक लाख 19 हजार रुपये दंड केला. 

कृष्णा अशोक कोरडे (वय 26, रा. माजलगाव, बीड), सोमनाथ भानुदास मोरे (वय 31, रा. शिंगणापूर, ता. नेवासे), आजिनाथ रावसाहेब ठोंबरे (वय 29, रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), रामचंद्र ऊर्फ राजू चिमाजी शेटे (वय 44, रा. वळण पिंप्री, ता. राहुरी), संदीप बहिरूनाथ थोपटे (वय 29, रा. राहुरी कृषी विद्यापीठ), राहुल बाबासाहेब दारकुंडे (वय 28, रा. मोरगव्हाण, ता. राहुरी), जावेद करीम शेख (वय 36, रा. देवगाव, ता. नेवासे) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी : वळण पिंप्री येथील हिंमत अभिमन्यू जाधव (वय 32) व त्याचा मित्र संतोष चव्हाण हे न्यायालयीन कामासाठी 12 सप्टेंबर 2016 रोजी नगरला आले होते. कामकाज आटोपल्यानंतर संतोष चव्हाण यांच्या दुचाकीवर बसून हिंमत जाधव औरंगाबाद रस्त्याने गावाकडे जात होते.

इमामपूर घाटाजवळ मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी जाधव यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते खाली कोसळले. संतोष चव्हाण याने घाटाखाली थांबलेल्या लक्ष्मण कुसळकर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. याबाबत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

तत्कालीन पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी तपास करून आरोपींना अटक केली. त्यानंतर भोईटे यांची बदली झाल्यावर हा तपास तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडे गेला. त्यांनी मुख्य सूत्रधार राजू शेटे याला अटक केली. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सरकारी पक्षातर्फे 25 साक्षीदार तपासण्यात आले.

मुख्य आरोपी शेटे याने जुन्या वादातून हिंमत जाधव यांच्या खुनाची सुपारी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे, आजिनाथ ठोंबरे यांना दिली होती. आरोपी संदीप थोपटे व राहुल दारकुंडे यांनी घटनेच्या दिवशी जाधव यांचे लोकेशन गोळीबार करणाऱ्यांना कळविले. आरोपी जावेद शेख याने आरोपींना पिस्तूल पुरविल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. केदार केसकर यांनी बाजू मांडली. 

संपादन - अशोक निंबाळकर