पारनेर दूध संघाच्या संचालकांना धोरणात्मक निर्णयास कोर्टाची मनाई

मार्तंड बुचुडे
Monday, 7 December 2020

न्यायालयाच्या आदेशानुसार, पठारे यांना सभेत कोणताही निर्णय घेता येणार नसल्याने ते नामधारी अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वीही ते अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांना सह्यांचे अधिकार नव्हते.

पारनेर ः पारनेर तालुका दूध संघाचे प्रशासकीय अध्यक्ष दादासाहेब पठारे व संचालक मंडळ पुन्हा एकदा केवळ नामधारी ठरले. दूध संघाच्या गुरुवारी (ता.10) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत, तसेच पुढील काळातही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, सद्यस्थिती कायम ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. 

नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी नुकतीच पारनेर तालुका दूध संघावर पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी रोहकले व सुरेश थोरात यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. त्याविरोधात तत्कालीन अध्यक्ष राहुल शिंदे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

शिंदे यांच्या याचिकेवर दोन दिवसांपूर्वी (ता. 4) सुनावणी झाली. प्रशासक मंडळाने 10 डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा बोलावली असून, सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, तसेच सध्याच्या स्थितीत कोणताही बदल करू नये, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार, पठारे यांना सभेत कोणताही निर्णय घेता येणार नसल्याने ते नामधारी अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वीही ते अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांना सह्यांचे अधिकार नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court restrains Parner Dudh Sangh directors from making strategic decision