esakal | शिर्डीत अॉक्सीजन प्लँटसह एक हजार बेडचे कोविड सेंटर

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर

शिर्डीत अॉक्सीजन प्लँटसह एक हजार बेडचे कोविड सेंटर

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः नगर जिल्ह्याला दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, तसेच साईसंस्थानच्या सहकार्यातून ऑक्‍सिजन प्लॅंटसह एक हजार बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून (ता. 29) सायंकाळी साईसंस्थानच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

बैठकीनंतर "सकाळ'शी बोलताना लोखंडे म्हणाले, ""आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या नियोजित कोविड सेंटरसाठी निधी मिळण्याकरिता पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री निधी आणि जिल्हा वार्षिक नियोजन निधी, याद्वारे तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

साईसंस्थानतर्फे रुग्णालयासाठी इमारत, भोजन व स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. राज्य सरकारकडून निधीबरोबरच डॉक्‍टर व कुशल वैद्यकीय कर्मचारी मिळविता येतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यासाठी आवश्‍यक ती सर्व मदत व सहकार्य करतील. येत्या दोन दिवसांत आपण मुंबईत जाऊन त्यांची व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत''

बैठकीस प्रांताधिकारी गोविंद शिंदे, साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पीतांबरे, शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, अमोल गायके, विश्‍वजित बागूल, संतोष जाधव, साई तनपुरे, चंद्रकांत गायकवाड उपस्थित होते.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजित रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत हा प्रस्ताव घेऊन खासदार लोखंडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जातील. त्यांनी यापूर्वीच या कोविड रुग्णालयाला हिरवा कंदील दाखविला आहे.

- कमलाकर कोते, शिवसेना नेते