esakal | गावातच उभारले कोविड सेंटर, चंदनापुरी ग्रामस्थांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर

गावातच उभारले कोविड सेंटर, चंदनापुरीचा ग्रामस्थांचा पुढाकार

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः गावातील युवकाचे कोरोनामुळे निधन झाल्याने सर्व जण व्यथित झाले. यापुढे कोणाचा असा मृत्यू होऊ नये, यासाठी युवकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकसहभागातून चंदनापुरी (ता. संगमनेर) गावात 50 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

मागील वर्षापासून कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. त्याचा अनुभव संगमनेरकरांनी चांगलाच घेतला आहे. मागील वर्षीचा प्रभाव कमी होत नाही, तोच दुसऱ्या व अधिक परिणामकारक लाटेमुळे जनजीवन विस्कळित झाले. अनेक घरांतील कर्ती माणसे या विषाणूची शिकार ठरली. त्यात तरुणाईचाही बळी गेला.

गावातील एका युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याची उपचाराअभावीची ससेहोलपट गावकारभाऱ्यांना अस्वस्थ करून गेली. आपल्या गावासाठी स्थानिक पातळीवर काही तरी सकारात्मक करण्याच्या उद्देशाने तरुणाई सरसावली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ग्रामस्थांच्या लोकसहभागातून चंदनेश्वर विद्यालयात 50 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यात लोकसहभागासह अन्नपूर्णा ग्रुप व साईमूळगंगा भक्तपरिवाराने मोठे योगदान दिले. हे केंद्र कोविडची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारे, तसेच इतरांना आदर्शवत ठरत आहे.

या केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी, तसेच डॉ. विशाल सातपुते, डॉ. रामनाथ देवके हे खासगी डॉक्‍टर रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करतात. याशिवाय रुग्णांसाठी ग्रामस्थ औषधी काढा, दूध पुरवितात. रुग्णांच्या समुपदेशनाबरोबरच त्यांचे मनोधैर्य आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संवाद साधला जातो.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण

कोविडच्या संकटात संघटित तरुणाई घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करीत आहे. या उपक्रमामुळे आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होत आहे.

loading image