Crime against 80 people including Congress district vice president Shewale
Crime against 80 people including Congress district vice president Shewale

निवडणुकीत बाउन्सर आणल्याने राडा, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शेवाळेंसह ८० जणांवर गुन्हा

कर्जत : तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असे म्हणत महसूल आणि पोलीस प्रशासन सुटकेचा निःश्वास टाकते न टाकते तोच त्याला मारहाणीचे गालबोट लागले. 

तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून प्रा. शहाजी देवकर यांच्यासह दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड कैलास शेवाळे यांच्यासह सुमारे सत्तर ते ऐंशी जणांवर कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यात प्रा.देवकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर निवडणुकीत प्रभाव टाकण्यासाठी बाहेरून बाउन्सर आणले प्रकरणी स्थापलिंग पॅनल प्रमुख प्रा. शहाजी देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यासमोर मारहाणीचा प्रकार घडल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तातडीने घटनास्थळी हजर झाल्याने अनर्थ टळला. ते येण्याची चाहूल लागताच हल्लेखोर पळून गेले.

मारहाणीप्रकरणी सतीश देवकर (रा वाघनळी ता कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते, त्यांचे चुलते प्रा. शहाजी देवकर, चुलत भाऊ रोहित देवकर, पोलीस कर्मचारी विक्की डेहनकर व वाहनचालक बाबा सुरवसे हे राशीन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करीत होते. 

शेवाळे व सुमारे सत्तर-ऐंशी लोकांनी येत स्वतः सतीश देवकर, प्रा. शहाजी देवकर आणि रोहित देवकर यांना मारहाण करीत गळ्यातील सोन्याची चेन व आयफोन कंपनीचा मोबाईल चोरून नेला. या फिर्यादीवरून अॅड कैलास शेवाळे यांच्यासह सत्तर -ऐंशी जणांवर मारहाणीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला.

ही घटना रात्री नऊच्या दरम्यान घडली. या बाबत शेवाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. दुसऱ्या घटनेत पोलीस कर्मचारी अमित बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल सायंकाळी वाघनळी येथे स्थापलिंग पॅनलप्रमुख प्रा. शहाजी देवकर यांचे घरी सोळा पहिलवान आणले असल्याची महिती मिळाली. त्या वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी भेट दिली असता त्यात तथ्य आढळले. यावरून श्री देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ही घटना सायंकाळी चार वाजता घडली आहे.
 

मी पॅनलप्रमुख असल्याने विरोधकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मला पोलीस संरक्षण मिळावे अशी मी गेल्या 13 तारखेला पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली होती. मात्र, निवडणुकीमुळे संरक्षण देता येत नाही असे सांगितले गेल्याने स्वतः च्या संरक्षणार्थ मी माझे मित्र काही पहिलवान आणले होते. काल रात्री मी टेबलखाली दडल्याने बचावलो. पोलीस संरक्षण असते तर ही घटना घडली नसती

- प्रा.शहाजी देवकर,पाटेगाव

कायद्यापेक्षा कोणीही महत्वाचा नाही. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. कालचा प्रकार मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर घडला असून त्याचे चित्रीकरण प्राप्त झाले आहे. ते तपासून कायदेशीर कारवाई केली जाईल.

-चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक, कर्जत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com