दोन कावळ्यांचे झाले भांडण, एक झाला गतप्राण अन् पुढे घडलेल्या प्रकाराने सर्वच हादरले

संजय आ. काटे
Saturday, 16 January 2021

चार दिवसांपूर्वी याच कावळ्या-कावळ्यांत श्रीगोंदा तालुक्‍यातील भानगाव येथे भांडण झाले. त्या भांडणामुळेच धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे परिसरातील सगळेच हादरून गेले आहेत.

श्रीगोंदे : कावळा कोणाचा आवडता पक्षी असतो की नाही हे माहिती नाही. परंतु हिंदू धर्मात कावळ्याचे महत्त्व फार मोठे आहे. पिंडाला काकस्पर्श झाल्याशिवाय आत्म्याला गती मिळत नाही, असे मानले जाते. त्यामुळे कावळ्याचा कितीही तिटकारा केला तरी मरणानंतर का होईना कावळा प्रत्येकाला हवाच असतो.

एखाद्या कावळ्याला जर कोणी इजा केली तर सर्व कावळे एकत्र होत त्या जखमी करणाऱ्या माणसावर हल्ला करतात. एवढी त्यांच्यात एकी असते, अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला पहायला मिळतात. कावळ्या सिक्स सेन्स माणसापेक्षा जास्त असतो, असे पक्षी अभ्यासकही मानतात. काही नैसर्गिक आपत्तींविषयी त्यांना अगोदर संकेत मिळतात. त्यानुसार त्यांचे वर्तन होते.

त्याचे असे झाली की... चार दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्‍यातील भानगाव येथे दोन कावळ्यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणामुळेच धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे परिसरातील सगळेच हादरून गेले आहेत. तर प्रशासनही अलर्ट झालेय. 

भानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात दोन कावळ्यांची तुफान भांडणे झाली. त्या भांडणात दोन्ही कावळे जखमी झाले. मात्र, एक उडून गेला आणि दुसरा जागीच मरण पावला होता. 

तेथील डॉ. घालमे यांच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती कळवित त्या मयत झालेल्या कावळ्याच्या रक्ताची चाचणी करण्यासाठी नमुने पुण्याच्या व तेथून नंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

हेही वाचा - भाजपचे चाणक्य रोहित पवारांच्या भेटीला

या बाबत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. गाडे यांनी दैनिक सकाळला सांगितले की, भानगाव येथील मयत कावळा व श्रीगोंदे शहरातील एक मयत झालेले कबुतर यांचे नमुने पाठविले होते. त्यापैकी कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह तर कबुतराचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

भानगाव परिसरातील एक किलोमीटर परिसरात औषध फवारणी करण्यात आली. त्या परिसरातील पाचशे कोंबड्यांची सद्यस्थिती तपासली आहे. संबंधित कावळ्यांची भांडणं झाली नसती तर बर्ड फ्लू साथीचा धोका लक्षात यायला उशिर झाला असता, असेही काही जाणकारांचे मत आहे.

तालुक्‍यातील श्रीगोंदे, काष्टी व बेलवंडी परिसरातील 160 कोंबड्यांची तपासणी त्याबाबत पुण्याच्या प्रयोग शाळेत नमुने पाठवले आहेत. कावळा एकाच ठिकाणी थांबत नाही, त्यामुळे परिसरातील लोकांनी घाबरुन जावू नये असे आवाहनही डॉ. गाडे यांनी केले आहे. 

 

कावळ्याला सगळं कळतं का...

कावळाच नव्हे तर कोणत्याही पक्षांना माणसापेक्षा सिक्स सेन्स जास्त असतो. त्यांना संकटांचीही चाहूल लागते. एखाद्याला काही आजार झाला असेल किंवा त्याच्या वर्तनात काही बदल झाला असेल तर इतर कावळे त्याला हाकलून देतात. हल्ली कावळ्यांच्या वर्तनातही बदल झालाय. आम्ही एका तलावात कावळ्यांना मासे पकडताना पाहिलंय. या वर्तन बदलाचा अभ्यास सर्वांगांनी अभ्यास व्हायला हवा. श्रीगोंद्यातील प्रकारही अभ्यासावा लागेल.

-शिवानंद हिरेमठ, पक्षी अभ्यासक, सोलापूर.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A quarrel between two crows revealed bird flu