ब्रेकिंग ः मुलगा म्हणतो, आईचे अनैतिक संबंध... नगर महापालिकेत आगडोंब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

एका अधिकाऱ्यासोबत आईचे अनैतिक संबंध असल्याने, तीही त्यांना विरोध करीत नव्हती. मी विरोध केला असता, दारू पिवून ते मला शिवीगाळ व मारहाण करीत.

नगर : बोल्हेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या घरात घुसून मद्यप्राशन करून महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे याच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला.

या बाबत विचारणा करणाऱ्या मुलाला मारहाण करून गच्चीवरून खाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 13 जून रोजी घडली. याबाबत पीडित मुलाच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - मंत्री प्राजक्त तनपुरे यांची बॅटिंग, लगावले सिक्सर

महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे, तसेच एक संशयित महिला अशी आरोपींची नावे आहेत. 

पीडित मुलाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की वडील महापालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत होते. आजारपणामुळे त्यांचा 2017 मध्ये मृत्यू झाला. अनुकंपा तत्वावर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून आई कामाला लागली. वडिलांच्या निधनानंतर शंकर मिसाळ, बाळू घाटविसावे, डॉ. अनिल बोरगे हे नेहमी आमच्या घरी येत. घरात दारू, सिगरेट पिवून धिंगाणा घालत.

एका अधिकाऱ्यासोबत आईचे अनैतिक संबंध असल्याने, तीही त्यांना विरोध करीत नव्हती. मी विरोध केला असता, दारू पिवून ते मला शिवीगाळ व मारहाण करीत.

मिसाळ याने तीन महिन्यांपूर्वी हाताला सिगारेटचे चटके दिले. 13 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता, घरातून मोठमोठ्याने आवाज ऐकू आल्याने मी झोपेतून जागा झालो. त्यावेळी डॉ. बोरगे, मिसाळ व आई खुर्चीवर बसले होते. घाटविसावे तेथेच उभा होता. दारूच्या चार बाटल्या आणि मटणाच्या जेवणाची चार ताटे लावली होती. तुम्ही इथे कसे आलात, असे विचारले असता, डॉ. बोरगे याने बूट काढून मारला. गच्चीवर जावून बसलो असता, तेथे हे चौघे आले. शंकर मिसाळ याने धक्काबुक्की केली.

डॉ. बोरगे व मिसाळ यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गच्चीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला.

या गुन्ह्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A crime against four people, including a health officer and a fire brigade chief