video : मंत्री प्राजक्त तनपुरेंची बॅटिंग...पहिला बाउन्सर सोडला...दुसऱ्याला मात्र षटकारच

विलास कुलकर्णी
Sunday, 28 June 2020

राहुरीच्या दिशेने मंत्री तनपुरे यांचा ताफा चालला होता. राघोहिवरे येथे मुलांना क्रिकेट खेळताना मंत्री तनपुरे यांनी पाहिले. त्यांनी गाडी थांबविली. मुलांच्या मैदानात उतरले.

राहुरी ः रस्त्याकडेला मोकळ्या शेतात सात-आठ मुले क्रिकेट खेळत होती. ते पाहून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ताफा अचानक थांबला. मंत्री तनपुरे क्रिकेटच्या मैदानात उतरले. बॅट हातात घेतली.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे विकेट किपर झाले.राहुरी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ स्लिपमध्ये उभे राहिले. जवखेडे खालसाचे सरपंच अमोल वाघ, एकनाथ तनपुरे यांनी टाईट फिल्डिंग लावली. स्थानिक मुलेही होतीच. मंत्री यांनी लगेच फ्रंटफूटवर येत त्यांनी चौकार-षटकार ठोकले. खेळाडू मुलेही भारावली. 

हेही वाचा - दहा गेले की बारा नव्याने बाधले

काल (शनिवारी) सायंकाळी साडेचार वाजता तिसगाव, (ता. पाथर्डी) दौरा आटोपून राहुरीच्या दिशेने मंत्री तनपुरे यांचा ताफा चालला होता. राघोहिवरे येथे मुलांना क्रिकेट खेळताना मंत्री तनपुरे यांनी पाहिले. त्यांनी गाडी थांबविली. मुलांच्या मैदानात उतरले.

मुलांनी क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. मंत्री तनपुरे यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी बॅट हातात घेतली. त्यांच्यासमवेत असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे विकेट किपर झाले.

राघोहिवरेच्या खेळाडूने बॉलिंग सुरू केली. पहिले दोन-तीन बॉल तटवून, मंत्री तनपुरे यांनी 'पिच' चा अंदाज घेतला. नंतर, फ्रंटफूटवर जाऊन तडाखेबाज चौकार ठोकला. पाठोपाठ, षटकार ठोकला. मंत्री तनपुरे यांची बॅटिंग पाहून मुलेही प्रभावित झाली. राजकारणाच्या 'पिच' वर फ्रंटफुटवर खेळणारे तनपुरे यांनी क्रिकेटच्या मैदानातही छाप सोडली. चक्क मंत्री आपल्याबरोबर क्रिकेट खेळतात. या आनंदाने मुले भारावली.

जाणून घ्या - पतीची विहिरीत उडी...पाठोपाठ पत्नी बहिणही आली

प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर सेल्फी घेऊन, आगळ्यावेगळ्या भेटीचा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. तीन मुले धाडसाने म्हणाली, "दादा... आम्ही तुम्हाला मतदान केले. तुम्ही मंत्री झालात. आमच्याबरोबर क्रिकेट खेळतात. यावर आमचाही विश्वास बसत नाही. परंतु, हा क्षण आम्ही कधीही विसरू शकणार नाही." 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Prajakta Tanpure hit fours and sixes