
राहुरी : दुपारी बॅंडबाजा वाजला. नवरीला घेऊन नवरदेव घरी आला. मित्रांनी वरातीचा बेत आखला. डीजेचा कर्णबधीर करणारा आवाज उठला. दणक्यात वरात निघाली. गावभर मिरली. मित्रांचे "नागिन डान्स' झाले. मनसोक्त आनंद लुटला; पण तो क्षणभंगुर ठरला.
कुणीतरी 100 क्रमांकावर कागाळी केली. वरात महागात पडली. पोलिसांनी बडगा उगारला. थेट नवरदेव, नवरदेवाचे वडील आणि डिजे मालकावर गुन्हा दाखल केला.
डिजेमालक, वरपिता, नवरदेव आरोपी झाले. दीड लाखांचा डिजेचा टेम्पो, 20 हजारांचा 40 किलोवॅट क्षमतेचा जनरेटर, 20 हजार रुपयांचे दोन साऊंड बॉक्स, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी पसार आहेत.
वांबोरी येथे चार दिवसांपूर्वी रविवारी (ता.30) झोकात लग्नसोहळा झाला. नवरीला घेऊन वऱ्हाडी खडांबे खुर्द येथील घरी परतले. सायंकाळी मित्रपरिवार व नातेवाईकांची बैठक जमली. काही झाले, तरी गावातून वरात मिरवायचीच ठरले. वांबोरी येथील डीजे बोलविला. रात्री नऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत गावभर वरात मिरली. डीजेच्या आवाजाने गावकऱ्यांची झोप उडाली. एकाने 100 क्रमांक डायल केला. तक्रार नोंदविली.
कोरोनाच्या संकटात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 31) सकाळी नवरदेवाला राहुरी पोलिस ठाण्यात बोलाविल्याचा निरोप धडकला. आदल्या रात्री गावकऱ्यांची झोपमोड करणाऱ्या नवरदेवाची डोळ्यावरची धुंदी खाडकन उतरली.
"डीजे नव्हता. छोटा साऊंड बॉक्स होता..' असे सांगणाऱ्या नवरदेवाला पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवण्यात आले. नवरदेवाला पोलिसी खाक्या दाखविताच, मित्रांची धावपळ उडाली. डीजे मालकासह सविस्तर माहिती पोलिसांना समजली. पोलिस कॉन्स्टेबल आजिनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.