esakal | हे काय भलतंच; शेतात उगवलंय कोरोनाचं झाड !
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus trees in forests in Maharashtra

देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

हे काय भलतंच; शेतात उगवलंय कोरोनाचं झाड !

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच प्रमाणात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. मार्चपासून महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरायला सुरवात केली. आता त्याने संपूर्ण महाराष्ट्र कवेत घेतला आहे. प्रत्येक घरात त्याचीच चर्चा सुरू असते.

ग्रामीण भागात तर लहान मुलांच्या ओठांवर सतत कोरोना शब्द असतो. बाळाची आई चिमुकल्यांना भीतीसुद्धा कोरोनाचीच घालताना दिसून येत आहे. याचा एवढा परिणाम झाला आहे, की शेतात आता एका झाडाचं नावच "कोरोनाचं झाड' असं ठेवण्यात आलं आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरवर्षी पाऊस पडला की रस्त्याच्या कडेला, जंगलात विविध झाडे, गवत उगवते. त्यात काही फुलांचीही झाडे व वेली असतात. त्यातीलच एक म्हणजे "धोत्रा'! लांबलचक पांढरेशुभ्र फूल या झाडाला असते. रस्त्याच्या कडेला व जंगलात हे फूल अनेकांचे लक्ष वेधून घेते. फुलानंतर या झाडाला एक भोंड येते. त्याच्या आवरणाला काटे असतात. काट्याचे आवरण असलेले हे भोंड सध्या चर्चेत असलेल्या कोरोना व्हायरसच्या व्हिज्वलप्रमाणे दिसते. 

जेव्हापासून कोरोना व्हायरस चर्चेत आला तेव्हापासून टिव्ही, वर्तमानपत्रे व शासकीय यंत्रणेकडून होत असलेल्या जनजागृतीत कोरोना विषाणूचा फोटो वापरला जातो. तोही गोल आणि त्याला काट्याप्रमाणे आवरण आहे. धोत्र्याचे भोंड आणि कोरोना विषाणूचा फोटो हे दोन्ही एकसारखे दिसत असल्याने ग्रामीण भागात धोत्र्याच्या झाडाला आता कोरोनाचं झाड असं म्हटलं जाऊ लागलं आहे. एखादी गोष्ट सतत दाखवली जाऊ लागल्यानंतर कसा प्रभाव पडतो, हे याचे उदाहरण आहे.

हेही वाचा : तीन तास जोरदार पाऊस झाला; शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास... 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्यांदा केंद्रात सरकार आले तेव्हा झालेल्या निवडणुकीत टिव्ही सुरू केला की मोदीच दिसायचे. तेव्हा मोदींचा घराघरात एवढा प्रभाव वाढला होता की, लहान मुलंसुद्धा मोदी-मोदी करत होते. अनेकांना मोदी कोण आहेत, ते काय करतात हे माहीत नव्हतं, मात्र घराघरात मुलंसुद्धा मोदींचे नाव घेत होते. 

अगदी त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरू झाल्यापासून सतत कोरोना-कोरोना दाखवले जात असल्याने मुलांवर व नागरिकांवरही त्याचा प्रभाव जाणवत आहे. एखादे लहान बाळ आईचे ऐकत नसेल तर त्याला "तो बघ कोरोना आला', असं म्हणून भीती घातली जात आहे. 

परवा शहराकडे चाललेल्या एका मित्राचा मुलगा त्याच्या मागे लागला. पप्पा मला तुमच्याबरोबर यायचे आहे, असं म्हणून तो रडत होता. त्यावर मित्राने "तिकडे कोरोना आहे. तू नको येऊस' असं म्हटल्यानंतर मुलगाही शांत झाला. अशी अनेक उदाहरणे आहेत. सध्या चिमुकल्यांसह नागरिकांवर कोरोनाचा किती प्रभाव पडला आहे, हे यावरून दिसून येते.

loading image