नेवाशात डेरेंनंतर आले करे, गुन्हेगारांसोबतच आहे घरभेद्यांचे आव्हान

सुनील गर्जे
Thursday, 18 February 2021

करे यांनी सोमवारी रात्री नेवाशाची सुत्रे स्वीकारल्यानंतर उपस्थित अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन त्यांना अपेक्षीत कार्येपद्धतीबाबत स्पष्ट शब्दात सूचना दिल्या

नेवासे : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नेवासे पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नियुक्तीने एक खमक्या पोलीस अधिकारी मिळाला आहे.

दरम्यान करे यांच्यासमोर संघटीत गुन्हेगारी अवैध व्यवसाय, मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी या मुख्य आव्हानाबरोबरच सुमारे पन्नास टक्के प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा असे आव्हान राहणार आहे. मागील पंचवार्षिक काळ सोडला तर पोलीस प्रशासनात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याने अधिकाऱ्यांना नेवाशात चांगले काम करण्याची संधी मिळाल्याचा इतिहास आहे. 

पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची (ता. 27) आक्टोबर रोजी नगर मुख्यालयात बदली झाल्यानंतर परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी नेवासे पोलीस ठाण्याचे सूत्र स्वीकारताच तालुक्यातील गुन्हेगारीसह अवैध व्यवसायिकांनी आपला गाशा गुंडाळला. मात्र, त्यांचा प्रशिक्षण कालावधी (ता. 20) जानेवारी रोजी संपताच गुन्हेगारी, अवैध व्यवसाय नव्या जोमाने सक्रिय झाले. 

हेही वाचा - सावधान, लग्नाबाबत आलीय नवी नियमावली

तालुक्यात नेवासे, नेवासे फाटा, कुकाणे हे बाहेरील 'हिस्ट्रीसिटर' गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनत असून त्यांना स्थानिक गुन्हेगार प्रवृत्तींची मदत होत असून त्यांचा गुन्हेगारीसाठी होणार वापर कारवाई करून रोखणे, नेवासे शहर, नेवासे फाटा, कुकाणे येथे कायमच होणारी वाहतूक कोंडी समस्या सोडविणे, अवैध धंदे, रस्तालूट, चोऱ्या थांबविण्यासाठी उपाययोजना करणे, याबरोबरच पोलीस ठाण्यातील ठराविक अधिकारी-कर्मचारी यांच्यातील अंतर्गत कलह, त्यांचे गुन्हेगारांशी हितसंबंध, त्यांना पाठबळ देणे, माहिती पुरविणे अशा ठराविक अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन स्व'गृह'तील विस्कटलेली घडी बसविणे, तसेच पन्नास टक्के प्रलंबित गुन्ह्यांची उकल करणे असे अनेक आव्हाने करे यांच्या समोर आहेत. 

पोलीस निरीक्षक विजय करे यांचा अठरावर्षांचा कार्येकाळ हा शहरीभागात गेला असून नेवासे हे ग्रामीण भागातील त्यांचे पहिलेच पोलीस ठाणे आहे. नगर जिल्ह्यात येण्याअगोदर ते नागपूर शहर येथे सायबर सेल, नंतर आंबाजारी पोलीस ठाण्यात कार्येरत होते. त्यांनी अनेक धाडसी कारवायांनी त्यांचा हा कार्यकाळ गाजवला. करे यांनी सोमवारी रात्री नेवाशाची सुत्रे स्वीकारल्यानंतर उपस्थित अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन त्यांना अपेक्षीत कार्येपद्धतीबाबत स्पष्ट शब्दात सूचना दिल्या.
 

"कायदा- सुव्यवस्थेशी तडजोड खपवून घेणार नाही. नेवासे पोलीस ठाण्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. यात गफलत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही. 
- विजय करे, पोलीस निरीक्षक, नेवासे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime challenge to police in Nevasa