तोतया पोलिस बनून नगरच्या महिलेची मुशाफिरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

शबनमविरुद्ध पहिला गुन्हा अमळनेर (जि. जळगाव) पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. अनधिकाराने घरात घुसून मारहाण, शिवीगाळ करून खुनाची धमकी दिल्याचा त्यात आरोप आहे.

नगर : पोलिसाचा गणवेश घातल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकून, महाराष्ट्र पोलिस दलामध्ये नोकरीस असल्याचा बनाव करून मुशाफिरी करणाऱ्या महिलेची तोतयेगिरी पोलिसांनी उघड केली आहे.

या प्रकरणी शबनम ऊर्फ समिना गफूर मोमीन (मूळ रा. जामखेड, हल्ली रा. केडगाव, नगर) या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये, तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिच्याविरुद्ध विविध आरोपांवरून तीन गुन्हे दाखल झाले असून, त्यांपैकी दोन अजामीनपात्र आणि एक जामीनपात्र आहे.

हेही वाचा - शिवभोजन योजनेतील भ्रष्टाचार आमदारांनीच केला उघड

शबनमविरुद्ध पहिला गुन्हा अमळनेर (जि. जळगाव) पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. अनधिकाराने घरात घुसून मारहाण, शिवीगाळ करून खुनाची धमकी दिल्याचा त्यात आरोप आहे. नगर येथील पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार मागे घ्यावी, यासाठी शबनमने अमळनेर येथे जाऊन फिर्यादी महिलेला घरात घुसून दांडक्‍याने मारहाण व शिवीगाळ करीत खुनाची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हा गुन्हा अजामीनपात्र आहे. याबाबतचे वृत्त 27 एप्रिल रोजी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. 
दरम्यान, शबनम संचारबंदीच्या काळात 23 एप्रिल रोजी नगर-अकोळनेर रस्त्यावर दुचाकी चालविताना पोलिसांना आढळली. तिच्या दुचाकीवर पोलिस दलाचे बोधचिन्ह होते.

कोतवाली पोलिसांनी त्या प्रकरणी शबनमविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिच्याविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा गुन्हा ठरला. कोतवाली पोलिस ठाण्यातील कर्मचारी तनवीर शेख हे या गुन्ह्यातील फिर्यादी असून, हा गुन्हा जामीनपात्र आहे. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी येथील सायबर पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल तनवीर सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून शबनमविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल झाला. सन 2016 ते 2018 या कालावधीत शबनमने पोलिसाचा गणवेश घातलेला फोटो, दुचाकीवर बसलेले असल्याचा फोटो व पोलिस अधिकाऱ्याची कॅप घालून काढलेला फोटो सोशल मीडिया अकाउंटवर टाकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

हा प्रकार तिने फसवणूक व तोतयेगिरी करण्याच्या उद्देशाने केल्याच्या आरोपावरून शबनमविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.तिच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा असून, तो अजामीनपात्र आहे. 
दरम्यान, संशयित आरोपी शबनम हिला "इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन' करण्यात आले आहे. तिची रवानगी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आवारातील महिला विलगीकरण कक्षात 14 दिवसांसाठी करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime of curfew violation against a woman