राष्ट्रवादीच्या या आमदाराने केली शिवभोजन योजनेतील भ्रष्टाचाराची पोलखोल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

धान्यवितरणासाठी दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश दिलेला असताना, फक्त दोन तास दुकाने सुरू ठेवून लोकांना नादी लावण्याचा प्रकार सुरू आहे.

नगरः ""सरकारने अल्प दरात गरजूंसाठी शिवभोजन योजना आणली. लॉकडाउनच्या काळात कोणीही गरजू उपाशीपोटी राहू नये, यासाठी पुरवठा विभागातर्फे धान्यवितरण सुरू केले. मात्र, शिवभोजन योजनेत केवळ 25 लोकांना जेवण देऊन शिवपंगत संपल्याचा डांगोरा केंद्रचालक पिटतात.

उर्वरित गरजूंच्या नावाखाली डुप्लिकेट फोटो अपलोड करतात. त्यामुळे बहुतांश गरजू अन्नापासून वंचित राहत आहेत. तसेच, धान्यवितरणासाठी दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश दिलेला असताना, फक्त दोन तास दुकाने सुरू ठेवून लोकांना नादी लावण्याचा प्रकार सुरू आहे.

हेही वाचा - शेवग्याच्या शेंगामुळे शेतकऱ्याला कोरोना

अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून, या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी वरिष्ठ पातळीवर करणार आहोत,'' अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 

"सकाळ'शी बोलताना जगताप म्हणाले, ""शिवभोजन योजनेतून जास्तीत जास्त गरजूंना अन्न मिळावे, यासाठी शिवथाळ्या वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत शिवभोजन योजना सुरू केली. उर्वरित तालुक्‍यांतही कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, लॉकडाउनच्या काळात काही केंद्रचालक गैरफायदा घेऊन, गरजूंना उपाशी मारून आपली पोळी भाजण्याचा धंदा करीत आहेत.

काही केंद्रांना 150 ते 200 थाळ्यांसाठी परवानगी असताना, 25 गरजूंना अन्न दिल्यावर उर्वरित थाळ्यांचे डुप्लिकेट फोटो अपलोड करून त्याचा पैसा लुबाडत आहेत.'' 

स्वस्त धान्य दुकानांतून होणाऱ्या धान्यवितरणातही मोठा गफला सुरू असल्याचे सांगून जगताप म्हणाले, ""दुकानदारांना आठ तास दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश असताना, दोन तासांत ती बंद केली जातात. गरजूंना धान्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्याला पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांची साथ आहे.'' 

संगमनेरात धान्याचा ट्रक पकडला 
जगताप म्हणाले, ""लॉकडाउनमध्ये गरजूंना अन्नधान्य मिळावे, यासाठी सरकारने तीन महिन्यांसाठी अन्नधान्य उपलब्ध करून दिले. धान्य नेणारा ट्रक नुकताच संगमनेर येथे पकडला. त्यात अधिकाऱ्यांची चौकशी होण्याऐवजी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात नेमके काय चाललेय, याची चौकशी होणे गरजेचे आहे.'' 

भुजबळांकडे वाचला अनागोंदीचा पाढा 
जिल्ह्यातील अनागोंदी कारभाराविषयी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सचिवांना चौकशीच्या सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच, आपणही वरिष्ठ पातळीवर पुराव्यानिशी तक्रार करणार आहोत, असे जगताप म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Sangram Jagtap exposed Shivbhojan Yojana corruption