
Crime news : लाखोंचे घबाड घेऊन तरुणीने प्रियकरासमवेत ठोकली धूम
पाथर्डी : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. अशाच आंधळ्या प्रेमाचा प्रत्यय पाथर्डीकरांना आला. शहरातीलच एका खाजगी आर्थिक संस्थेत काम करणाऱ्या एका युवतीने संस्थेतून तब्बल ३८ लाखांची रोकड आणि १२ तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत धूम ठोकली. संस्थामालकाने गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना युवतीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. या युवतीचा पोलिस शोध घेत आहेत.
गेल्या काही वर्षांत शहरासह तालुक्यात विविध खासगी आर्थिक संस्थाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. या संस्थांत जास्त व्याजदर मिळतो म्हणून अनेकांनी ठेवी ठेवल्या आहेत. काहींनी झटपट सोनेतारण कर्ज मिळत असल्याने सोने गहाण ठेवले आहे. शहरात असलेल्या एका आर्थिक संस्थेत अनेकांची ये-जा असायची. ठेवीदारांनी आपल्या ठेवी या संस्थेत ठेवल्या. संस्थेत एका वीस वर्षांची युवती व्यवस्थापक म्हणून काम पाहात होती.
ही युवती एका तरुणाच्या प्रेमात पडली. युवतीने संस्थेत ठेवीदारांनी ठेवलेली ३८ लाख ३४ हजार रुपयांची रोकड अन् बारा तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत धूम ठोकली. संस्था मालक हतबल झाला आहे.दरम्यान, तरुणीच्या आईने मुलगी पैसे व दागिने घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.