esakal | डुबीचं डुबलं, उंचावर सोनं पिकलं; सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना हात, दिवाळीच्या तोंडावर हातात पैसा
sakal

बोलून बातमी शोधा

Crops are good in Nagar district due to rains

सलग १०० दिवस कोसळलेल्या पावसाने "डुबीचं रान डुबलं; मात्र उंचावरील रानात अक्षरशः सोनं पिकलं..' खळ्यावर सोयाबीनच्या मोत्यासारख्या टपोऱ्या, चकचकीत दाण्यांच्या राशी लागल्या.

डुबीचं डुबलं, उंचावर सोनं पिकलं; सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना हात, दिवाळीच्या तोंडावर हातात पैसा

sakal_logo
By
सतिश वैजापुरकर

शिर्डी (अहमदनगर) : सलग १०० दिवस कोसळलेल्या पावसाने "डुबीचं रान डुबलं; मात्र उंचावरील रानात अक्षरशः सोनं पिकलं..' खळ्यावर सोयाबीनच्या मोत्यासारख्या टपोऱ्या, चकचकीत दाण्यांच्या राशी लागल्या. एकरी 10-12 पोत्यांचा उतारा आणि 3000-3600 रुपये क्विंटलचा भाव मिळाला. शेतकऱ्यांचे चेहरे उजळले. शेतमजुराच्या घामाला अधिक दाम मिळाले. सोयाबीनने यंदा रब्बीसाठी बेगमी आणि दिवाळीसाठी खर्चीदेखील दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यंदा 80 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. सलग शंभर दिवस पाऊस कोसळला. बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली. पिकाला पाणी देण्याचीही वेळ आली नाही. उलट, सततच्या पावसाने सखल भागातील पिकांचे नुकसान झाले. उंचावरच्या क्षेत्रावरील पीक उत्तम आले. पाण्याचा ताण न पडल्याने दाणा मोत्यासारखा टपोरा आणि चकचकीत झाला. एकरी 10-12 पोत्यांपर्यंत उत्पादन झाले. प्रतिक्विंटल तीन ते तीन हजार 600 रुपये भाव आहे. तुलनेत बरा भाव असल्याने शेतकरी खळ्यावरून थेट व्यापाऱ्याला माल विकत आहेत. दिवाळी आली. रब्बीची मशागत करावी लागेल. त्यामुळे इच्छा असूनही बरेच शेतकरी सोयाबीन साठवू शकत नाहीत. 

यंदा पेरणीपासूनच पावसाने हजेरी लावली. सोंगणीच्या वेळी काहीशी उघडीप दिली. पेरणीनंतर फवारणी वगळता, सोंगणीलाच शेतात पाऊल ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. पहिल्या पाच ते सात दिवसांतच जवळपास 60 ते 70 पिकांची सोंगणी आणि मळणी उरकली. आकाशात ढग जमत असल्याने, गंजी लावल्यानंतर प्लॅस्टिक कागदाने त्या झाकण्याची वेळ आली. या कागदविक्रीतून लक्षावधीची उलाढाल झाली. शेतकऱ्यांनी मोठा आटापिटा केला; मात्र एकरी उतारा चांगला असल्याने ते सुखावले. एकरी 15 ते 20 हजार रुपयांचे नगदी उत्पन्न मिळाले. 

राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर म्हणाले, राहाता बाजार समितीच्या मोंढ्यावर आज 500 पोत्यांची आवक झाली. 11 ते 12 टक्के ओलावा असलेल्या मालास 3700 रुपये, 15 ते 20 टक्के ओलावा असलेल्या मालास 3400 रुपये व 20 ते 25 टक्के ओलावा असल्यास 3250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

सोयाबीन उत्पादक शेतकरी कैलास घोरपडे म्हणाले, यंदा सोयाबीनचा उतारा चांगला आहे. पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी सोयाबीन विकत आहेत. भाव वाढण्याची शक्‍यता आहे, हे माहिती असूनही त्यांचा नाइलाज आहे. सध्याचे चित्र पाहून वाईट वाटते. 

सोयाबीन उत्पादक शेतकरी रावसाहेब गाढवे म्हणाले, विशेष मेहनत घेऊन सोयाबीनची काळजी घेतली अशा शेतकऱ्यांना एकरी 15 पोत्यांपर्यंत उतारा मिळाला. सोयाबीनसाठी जास्त पाऊस उपयुक्त असतो. खोलगट भाग वगळता अन्य ठिकाणची पिके जादा पावसाने आणखी चांगली आली आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image