संगमनेरात हॉटेल्समध्ये उसळली गर्दी, पार्सलच्या नावाखाली धंदा जोरात

Crowds at hotels in Sangamnera
Crowds at hotels in Sangamnera

संगमनेर ः सुमारे पाच महिन्यांपासून कोरोनाचा उपद्रव सहन करणाऱ्या संगमनेरकरांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन काही काळ काटेकोरपणे केले. मात्र, दिवसेंदिवस नियमांची सर्रास पायमल्ली होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. संगमनेर शहर व परिसरातील काही अपवाद वगळता विविध खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनी खवय्यांना पुन्हा पहिल्याप्रमाणे सेवा देण्यास सुरवात केली आहे. 

संगमनेरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने अत्यंत कठोर निर्बंध घातले होते. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार पहिले काही दिवस भीतीच्या सावटाखाली, लागू केलेल्या नियमाप्रमाणे दैनंदिन व्यवहार सुरु होते. त्याकाळात कोरोनाची रुग्णसंख्या व प्रादुर्भाव आटोक्यात होता. नंतर सरकारने टप्प्याटप्प्याने लागू केलेल्या अनलॉक प्रक्रियेमुळे नियम शिथील करण्यात आले. मात्र, या काळात कोरोनाचा प्रादुर्भावही उत्तरोत्तर वाढतच गेला. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. मात्र दरम्यानच्या काळात शहरात तालुक्यातील इतर गांवामधील नागरिकांचा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी तसेच शेतीमाल विक्रीसाठी संपर्क वाढल्याने कोरोनाचे लोण तालुक्यात पसरले. गेल्या तीन-चार महिन्यांत झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सोळाशेच्या पुढे गेली. सुदैवाने त्यातील केवळ दोनशे रुग्ण सध्या अॅक्टीव्ह आहे. याचा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. 

तालुक्यातील सुमारे 100 गावे कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहेत. 
सकाळी 9 ते 5 या काळात सुट दिल्याने दुकाने सुरु झाली आहेत. दिवसागणीक ग्राहकांची गर्दी वाढते आहे. शहर व परिसरातील हॉटेल, ढाबे, छोटी उपहारगृहे, फिरती उपहारगृहे यांना प्रशासनाने केवळ पार्सल सेवा देण्याची परवानगी दिली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिध्द हॉटेल्स गजबजली आहेत. तेथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जात आहे.

याला पदपथावरील ऑम्लेट पाव, पाववडे, दाक्षिणात्य खाद्य पदार्थ, पावभाजी विक्रीच्या गाड्याही अपवाद नाहीत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना पायदळी तुडवल्या जात आहेत. इतकेच नव्हे शहर व शहरालगतच्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे व हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 


कार्यक्षेत्रातील छोट्या़मोठ्या हॉटेल अथवा ढाब्याला केवळ पार्सल सुविधा देण्याचे आदेश आहेत. ग्राहकांना बसून खाण्याची सुविधा पुरवणे, कोवीड प्रादुर्भावाच्या काळात गैर आहे. नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या जातील. 
- अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर. 

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com