esakal | कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी तरूणांची झुंबड

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर
कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी तरूणांची झुंबड
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पारनेर ः कोरोनाबाधितांचा तालुक्‍यातील आकडा वाढत आहे. त्यामुळे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. तेथे डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. तिला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे तालुक्‍यातील भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी, पारनेर शहरात पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे व पिंपळगाव रोठे येथे कोरठण देवस्थानतर्फे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र रुग्णांवर उपचार करणे व इतर कामांसाठी आरोग्याधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची गरज होती. त्यासाठी आज (ता. 19) भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. त्याला तालुक्‍यातील तरुणाईचा प्रतिसाद मिळाला.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. कोरोनाचे संकट मोठे असतानाही अनेक जण त्याची पर्वा न करता कामासाठी पुढे आल्याचे आज स्पष्ट झाले.

मुलाखतीसाठी 200पेक्षा जास्त तरुण-तरुणी उपस्थित होत्या. मुलाखती घेऊन तहसीलदार देवरे यांनी नियुक्‍त्या दिल्या. दहा आरोग्य अधिकाऱ्यांची गरज असता, एकही उमेदवार मिळाला नाही. आज 124 उमेदवारांना नेमणुका देण्यात आल्या. मुलाखतीसाठी तहसीलदार देवरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. त्यात गटविकास अधिकारी किशोर माने, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. अश्‍विनी गुंजाळ, डॉ. मनीषा उंद्रे आदींचा समावेश होता.

तीन महिन्यांसाठी दिल्या नियुक्त्या

कोविड सेंटरवर तात्पुरत्या स्वरूपात तीन महिन्यांसाठी नेमणुका दिल्या आहेत. गरजेनुसार कालावधी वाढविण्यातही येईल. मात्र, या कठीण काळात त्यांनी दिलेली सेवा सरकारी नोकरभरतीच्या वेळी विचारात घेतली जाणार आहे. त्यांची सेवा ही राष्ट्रसेवा आहे. या सेवेचे फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

बातमीदार - मार्तंड बुचुडे