संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची केली तोडफोड

रोजा सुटण्यावेळी झालेली गर्दी पांगवल्याने झाला उद्रेक
crime
crimeE sakal

संगमनेर ः रमजानच्या पवित्र महिन्याचा रोजा सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी झाल्याने, जमावाला कोविडचे नियम समजावून सांगत गर्दी न करण्याचे आवाहन करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या पोलिसांना धक्काबुक्की करीत, पोलिस व खासगी वाहनांवर गुंड प्रवृत्तीच्या काही जणांनी हल्ला चढवला. (Crowds throw stones at police in Sangamner)

यावेळी पोलिसांनी अधिक अनर्थ टाळण्यासाठी तेथून काढता पाय घेतल्याची घटना, संगमनेर या संवेदनशील शहरातील तीन बत्ती परिसरात गुरुवारी ( ता. 06 ) रोजी सायंकाळी सव्वासहा ते सात या सुमारास घडली.

या बाबत दाखल झालेल्या तक्रारीवरुन रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात निष्पन्न आरोपींसह सुमारे दहा ते पंधरा जणांवर जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे यासह दंगलीचा गुन्हा दाखल केला. या सुमारास या घटनेच्या काही व्हिडिओ क्लिप्स शहरातील प्रसारमाध्यमावर व्हायरल झाल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील लखमीपूरा परिसरातील रोजा सुटण्याच्या वेळी गर्दी झालेली समजताच नियंत्रणासाठी नगरहून आलेल्या राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी मास्क, सामाजिक अंतराचे पालन या नियमांची पायमल्ली करणाऱ्या जमावाला शांततेत व धाक दाखवून पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हुल्लड करणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी थेट पोलिसांनाच टार्गेट करुन धक्काबुक्की व शिवीगाळ केली.

यावेळी काहींनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोगलपूरा परिसरातील बॅरिकेड तसेच तीन बत्ती चौकात पोलिसांना सावलीसाठी टाकलेल्या राहुटीचे नुकसान केले. तसेच पोलिस वाहनांसह या परिसरातील काही खासगी वाहनांवर दगडफेक करुन वाहनांचे नुकसान व दहशत निर्माण केली.

या संवेदनशील प्रसंगी अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी शहराच्या दिशेने पलायन केले. या घटनेत पोलिस मुख्यालयातील पोलिस काँस्टेबल सलमान मुख्तार शेख, प्रशांत प्रभाकर केदार व भगीरथ शंकर देशमाने जखमी झाले आहेत. यावेळी तीन बत्ती चौकात सुमारे शंभर ते दीडशे जणांचा मोठा जमाव जमला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख आदींनी भेट देत शांततेचे आवाहन केले.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या निष्पन्न आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 337 यासह दंगलीचे कलम 143, 147 तसेच 188, 269 व क्रिमिनल अमेंडमेंट कायदा 1932 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. या घटनेचे मोबाईलवर केलेल चित्रीकरण रात्री समाजमाध्यमावंवर व्हायरल झाल्याने सर्व स्तरातून विविध संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करणाऱ्यांची गय न करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.(Crowds throw stones at police in Sangamner)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com