नेवाशात अतिवृष्टीमुळे तुरीच्या झाल्या तुराट्या

सुनील गर्जे
Monday, 19 October 2020

प्रारंभी तुरीची पाने पिवळी पडली व पानगळती सुरू झाली. त्यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी महागाची औषधफवारणी केली. पण, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे तूरउत्पादक संकटात सापडले आहेत.

नेवासे : सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पानगळ होऊन उभ्या तुरीच्या "तुऱ्हाट्या' झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने तूरउत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसाने ऊसपीक आडवे झाले. नंतर सोयाबीन, कपाशीलाही पावसाचा तडाखा बसला. सोयाबीन काढणीच्या वेळी सततच्या मुसळधार पाऊसाने सोयाबीनला कोंब फुटले. कपाशीला पातेगळ, बोंडगळ होऊन बोंडे काळी पडली आहेत. अनेकांची शेती उपळल्याने तुरीच्या पिकाच्या मुळ्या सडल्या आहेत. त्यामुळे तुरीचे उभे पीक जागीच वाळून जात आहेत. 

प्रारंभी तुरीची पाने पिवळी पडली व पानगळती सुरू झाली. त्यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी महागाची औषधफवारणी केली. पण, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे तूरउत्पादक संकटात सापडले आहेत. तालुक्‍यात परतीच्या पावसाने तुरीचे 30-35 टक्के नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील देडगाव, माका, तेलकुडगाव, देवसडे, जेऊर हैबती शिवारात मोठे नुकसान झाले आहे. 

सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने तुरीचा खराटा झाला असला, तरी तालुक्‍यात 65-70 टक्के तूर फुलांनी बहरली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्याने बहरलेल्या तुरीवर रोग, कीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. जोरदार पावसाच्या अंदाजाने उरलेले तुरीचे पिकही हातून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. 

चार एकरांवर तुरीचे पीक घेतले; मात्र परतीच्या पावसाने दोन-अडीच एकर पीक पूर्णपणे वाळल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, पुन्हा पाऊस झाल्यास लागवडीचा खर्चही निघेल की नाही, अशी भीती आहे. 
- दत्ता मुंगसे, प्रगतशील शेतकरी, देडगाव, नेवासे , अहमदनगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to trumpets due to heavy rains

Tags
टॉपिकस
Topic Tags: