उजनीला वेढले जलपर्णीने; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

अशोक मुरुमकर
Friday, 16 October 2020

शंभर टक्के भरलेल्या उजनी धरणाला जलपर्णीने वेढले आहे. बॅकवॉटर भागात दोन्ही बाजुला जलपर्णी आल्याने सर्वत्र हिरवेगार दिसत आहे.

अहमदनगर : शंभर टक्के भरलेल्या उजनी धरणाला जलपर्णीने वेढले आहे. बॅकवॉटर भागात दोन्ही बाजुला जलपर्णी आल्याने सर्वत्र हिरवेगार दिसत आहे. धरण भरलेले असताना सुद्धा पाण्यापेक्षा येथे जलपर्णीच मोठ्याप्रमाणात दिसत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर नदीवर परिणाम होईल, अशी भिती जल तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात यावर्षी जूनपासूनच जोरदार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे सर्व शिवार हिरवागार झाला होता. ओढे- नाले, नद्यांनाही गेल्या काही वर्षाच्या तुलनेत लवकर पाणी आले होते. सध्या महाराष्ट्रातील काही अनेक भागात परतीचा पाऊस सुरु आहे. या पावसाने नद्या व ओढे कधी नव्हे ऐवढे भरुन वाहीले.

नगर जिल्ह्यातील राशीन, सिद्धीटेक भागात अनेक ओढ्यांचे पाणी रस्त्यावरुन वाहीले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडसह काही भागात व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात अशीच स्थिती झाली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला तसा शेतीवर मोठ्याप्रमाणात झाला. शेतीचे बांध फुटून नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने काही ठिकाणी तर छोटे नाले सुद्धा फुटले आहेत. भीमा नदीलाही मोठ्याप्रमाणात पाणी आले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे काहीजणांनी पुण्याला जाण्यासाठी व पुण्याहून येण्यासाठी अनेकांनी मार्ग बदलले होते. त्यातून वाहतुकीसाठी बंद असलेल्या सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ढिकसळ पुलाचा अनेकांनी मार्ग स्विकारला. या पुलाच्या दोन्ही टोकांना जलपर्णी आहे. या पुलावरुन येताना उजनीचे पाणी समुद्रा सारखे दिसते. त्यातच जलपर्णी सर्वांचे लक्ष वेधून घेते.  

या जलपर्णीमुळे शेतकऱ्यांना विद्युत पंप बसवताना अडचणी येत असल्याचे दिसते. जलपर्णी कढेला आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनाही अडचणीचे ठरत आहे. सध्या ऊस तोड कामगार या भागात आले आहेत. त्यांचे वास्तव्य सध्या पाण्याच्या कडेला आहे. त्यांना या जलपर्णीतून मार्ग काढून पाणी आणावे लागत आहे. पाण्याचा प्रवाह आहे तिथे जलपर्णी नाही, मात्र नदीच्याकढेपासून लांबच्या लांब जलपर्णी दिसत आहे. 

कोल्हापूर येथील जल अभ्यासक संदिप चोडणकर म्हणाले, जलपर्णीमुळे हवेचा संपर्क पाण्याशी येत नाही. पाण्यात ऑक्सिजन न विरघळल्याने माशांवरही परिणाम होतो. जलपर्णीचे धर वाढत केले तर त्यावर माणूस आणि जनावरेही चालत जाऊ शकतात. त्यामुळे नद्या नष्ट होऊ शकतात. यामुळे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. नदीत येणारे सांडपाणी यावर नियंत्रण हवे. त्यावर प्रक्रिया झाल्याशीवाय ते नदीत सोडू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger due to water hyacinth in Ujani dam