केवळ भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने काही कळायच्या आतच झालं होत्याचे नव्हते

सतीश वैजापूरकर
Saturday, 8 August 2020

घरदार सोडून रानोमाळ भटकंती करीत ऊन, वारा, थंडी सोसत मेंढ्यांचे पालनपोषण करण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या त्या मेंढपाळांचे स्वप्न गुरुवारी उद्‌ध्वस्त झाले.

शिर्डी (अहमदनगर) : घरदार सोडून रानोमाळ भटकंती करीत ऊन, वारा, थंडी सोसत मेंढ्यांचे पालनपोषण करण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या त्या मेंढपाळांचे स्वप्न गुरुवारी उद्‌ध्वस्त झाले. सायंकाळी मेंढ्यांचा कळप रेल्वेमार्ग ओलांडायला आणि एका बाजूने रेल्वेइंजिन यायला एकच गाठ पडली.

क्षणार्धात एकापाठोपाठ ४० मेंढ्यांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. ध्यानीमनी नसताना हा विध्वंस पाहणे मेंढपाळांच्या नशिबी आले. भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने वाकडी येथील दौंड- मनमाड रेल्वेमार्गावर हा अपघात घडला.

मेंढ्या आजूबाजूला न पाहता खाली मान घालून चालतात. त्यामुळे त्या एकापाठोपाठ एक इंजिनाला धडकत राहिल्या. हा सुमारे ५० मेंढ्यांचा कळप रेल्वेमार्ग ओलांडत असताना काही कळण्याचा आत ४० मेंढ्यांच्या रक्तामांसाचा चिखल सुमारे १०० फूटापर्यंत उडाला. या रेल्वेमार्गावर राहाता व कोपरगाव तालुक्‍यात रेल्वे फाटकाऐवजी भुयारी मार्ग करण्यात आले. मात्र, त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची कुठलीही सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बऱ्याच भुयारी मार्गांमध्ये पावसाचे पाणी साचते. वाहतूक बंद होते. ग्रामस्थ हैराण होतात. दोन- अडीच महिन्यांपासून त्या भागातील लोकांचे असे हाल सुरू आहेत. 

वाकडी येथील नव्याने तयार केलेल्या रेल्वेफाटकाजवळ भुयारी मार्गात दोन ते तीन फूट उंचीपर्यंत पावसाचे पाणी साचले होते. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव भागातून मेंढ्या चारण्यासाठी येथे आलेले हे मेंढपाळ आपला कळप घेऊन येथे वास्तव्यास होते. त्यांना रेल्वेमार्ग ओलांडून पलीकडे जायचे होते. मात्र, भुयारी मार्गात पाणी साचल्याने त्यांनी कळप रेल्वेमार्गावर नेला. काही क्षणातच मनमाडकडून भरधाव आलेल्या रेल्वेइंजिनाने हा कळप अक्षरशः चिरडून टाकला. मेंढपाळांचे सर्वस्व हिरावले गेले. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते झाले. 

राहाता व कोपरगाव तालुक्‍यांत रेल्वेच्या बऱ्याच भुयारी मार्गांमध्ये सध्या पाणी साचते. वाहतूक बंद पडल्याने लोकांचे हाल होतात. त्यातूनच हा अपघात घडला. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
- बाळासाहेब वाघ, माजी संचालक, गणेश सहकारी साखर कारखाना 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daund Manmad railway route 40 sheep killed in Kopargaon taluka