esakal | कोविडने पुसले अडीचशे महिलांचे कुंकू! अनेक सुखी संसार उद्‌ध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Death

कोविडने पुसले अडीचशे महिलांचे कुंकू! अनेक संसार उद्‌ध्वस्त

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि. नगर) : कुणाचे पितृछत्र हरपले, कुणाची म्हातारपणची काठी गेली, कुणाकडे बक्कळ पैसा तरीही चूल पेटवायला नाही कुणी. कमावता माणूस गेला, जगायची झाली पंचाईत. काही घरांत लहानग्यांना सांभाळायलाच राहिले नाही कुणी. तालुक्‍यातील सुखी अनेक संसार कोविडच्या (Corona Virus) दोन्ही लाटांनी उद्‌ध्वस्त करून टाकले.

वैधव्य आलेल्या महिलांच्या संख्येने केला अडीचशेचा आकडा पार. कुणाची आई गेली तर कुणाचे गेले वडील. न सोसणारे दुःख वाट्याला आलेल्या मुलांची संख्या गेली दोनशेच्या पार. मातृ-पितृछत्र हरपल्याने काही मुले झाली निराधार. पंचायत समितीच्या सर्वेक्षणात पुढे आलेल्या या धक्कादायक वास्तवाने न सुटणारे प्रश्न निर्माण केलेत. (death-due-to-corona-in-nagar-district-marathi-news)

''मदत नको; गौरव परत करता आला तर पाहा''

चितळीत महाराष्ट्र बॅंक शाखेचे व्यवस्थापक गौरव शुक्‍ल (वय ३६) आणि अस्तगाव शाखेत व्यवस्थापक असलेल्या त्यांच्या पत्नी अनुपमा वाजपेयी या उत्तर प्रदेशातील दाम्पत्याला चार वर्षांचा एकुलता एक मुलगा. महिन्याला दोन लाखांची प्राप्ती. संसार सुखाने सुरू होता. कोविडने चितळीत हाहाकार उडवला. त्यात गौरवचा बळी गेला. दुःखाने व्याकूळ अनुपमा म्हणाल्या, ‘सर्व काही संपले, सूर्यास्त झालाय.’ लहानग्याला घेऊन त्या लखनौला निघून गेल्या. बॅंकेने तातडीची पन्नास हजार रुपयांची मदत दिली. घरचे म्हणाले, ‘मदत नको; गौरव परत करता आला तर पाहा.’ दुःखाच्या डागणीचे हे प्रातिनिधिक उदाहरण. एकट्या चितळीत तब्बल साठ कुटुंबांचे प्रियजन कोविडने हिरावून नेले. कुणी कुणाचे डोळे पुसायचे?

हेही वाचा: 'त्या' डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

घरातील ज्येष्ठांचा सांभाळ करायचा कुणी?

नवरा गेला, कपाळाचे कुंकू पुसले. कुटुंबाचा आर्थिक कणा मोडला. वैधव्याचे भोग आलेल्या शंभर महिलांनी पंचायत समितीकडे आर्थिक मदतीची मागणी केलीय. लेकरंबाळं आणि घरातील म्हातारी माणसं, जगण्याचे संकट आ वासून उभे राहिले. घरदार, पैसा सर्व काही आहे; मात्र मुलं लहान आहेत. पतीच्या निधनानंतर भार पत्नीच्या खांद्यावर आला. तिला कुठल्याही आर्थिक व्यवहाराची माहिती नाही. काही घरांत ही वेगळीच समस्या सतावतेय. वैधव्य आलेल्या महिलांत शंभराहून अधिक महिला तरुण आहेत. नुकतेच लग्न झालेल्या काहींना माहेरची माणसं घेऊन गेली. आता घरातील ज्येष्ठांचा सांभाळ करायचा कुणी?

हेही वाचा: मेंटल डिस्टंसिंग म्हणजे नेमकं काय?

एक ते अठरा वर्षांपर्यंतच्या दोनशेहून

अधिक मुलांचे आई किंवा वडील मृत्युमुखी पडले. या मुलांच्या भावविश्वाचा चोळामोळा झाला. साई अरिहंत पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल यांच्याकडे आपल्या पंधरा वर्षांच्या मुलाला घेऊन वडील आले. भूसंपादनातून आलेले पैसे त्यांनी संस्थेत ठेव म्हणून ठेवले. जाताना म्हणाले, ‘भाऊ एवढे पैसे आले; मात्र आनंद नाही वाटला. भरल्या संसारातून मुलाची आई निघून गेली. आम्हाला दिवस वर्षासारखा वाटतोय.’ कोविड विध्वंसाचे हे आणखी एक प्रातिनिधिक उदाहरण.

कोविड तांडवाची दाहकता

एखाद्या कुटुंबातील तरुण कर्त्या पुरुषाचे किंवा घर सांभाळणाऱ्या महिलेचे अकस्मात निधन होते. अशा वेळी एकाच वेळी दोन कुटुंबांना त्याची झळ पोचते. तालुक्‍यात अडीचशे महिलांना वैधव्य आले, याचा अर्थ असा, की अडीचशे पुरुषांचा कोविडने बळी घेतला. मात्र, मृतांच्या एकूण संख्येत किती महिलांचा बळी गेला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही एकूण संख्या गृहीत धरली, तर या धगधगत्या कोविड तांडवाची दाहकता लक्षात येते. सहा मुलांनी तर आपले आई आणि वडील दोघेही गमावलेत.

(death-due-to-corona-in-nagar-district-marathi-news)

loading image