कर्ज हप्ते, व्याजाला मार्चपर्यंत स्थगितीसाठी शिवसेनेच्या लोखंडेंना साकडे

आनंद गायकवाड
Thursday, 1 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरपर्यंत सर्व प्रकारचे कर्जहप्ते व त्यावरील व्याजाला स्थगिती देऊन देशभरातील कर्जदारांना दिलासा देण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे शिवसेना कार्यकर्त्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरपर्यंत सर्व प्रकारचे कर्जहप्ते व त्यावरील व्याजाला स्थगिती देऊन देशभरातील कर्जदारांना दिलासा देण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे शिवसेना कार्यकर्त्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

कोरोना महामारीमुळे प्रशासन, उद्योगधंद्यांसह सर्वसामान्यांवर अनिष्ट परिणाम होत आहे. वेतनकपात, कंपन्या बंद पडणे, कामावरून कमी करणे, असे गैरप्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्ष तुटीचे व नुकसानीचे जाहीर करून, 31 मार्च 2021पर्यंत सर्वच प्रकारचे कर्जहप्ते व त्यावरील व्याजाला स्थगिती द्यावी. पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्रिमंडळ व रिझर्व्ह बॅंकेकडे तशी मागणी व त्यासंबंधी पाठपुरावा करावा, असे निवेदनात म्हटले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वसामान्य कर्जदारांना संघटित करून पंतप्रधानांचे कार्यालय, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर व कामगार आयुक्तांना याबाबत राज्यभरातून निवेदने पाठविण्याची मोहीम सुरू करणार असल्याची माहिती प्रथमेश बेल्हेकर यांनी दिली. निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, रवींद्र कानकाटे, संभव लोढा, ब्रह्मा खिडके, गुलाब भोसले, रवी गोसावी, रमेश काळे, तसेच शहरातील छोटे व्यावसायिक व असंघटित कामगार प्रतिनिधी यांच्या सह्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for deferment of loan installments till March