esakal | निवडणूक रिंगणात काँग्रेच्या चिन्हावर; प्रचार मात्र भाजपच्या उमेदवाराचा
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for disqualification of Shringoda taluka mayor Shubhangi Pote

पालिकेची निवडणूक नगराध्यक्ष शुभांगी पोटे व त्यांचे नगरसेवक पती मनोहर पोटे यांनी कॉंग्रेसकडून लढविली.

निवडणूक रिंगणात काँग्रेच्या चिन्हावर; प्रचार मात्र भाजपच्या उमेदवाराचा

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : पालिकेची निवडणूक नगराध्यक्ष शुभांगी पोटे व त्यांचे नगरसेवक पती मनोहर पोटे यांनी कॉंग्रेसकडून लढविली. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला. त्यामुळे या दोघांना अपात्र ठरवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. 

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड. ऋषिकेश गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांनी ही मागणी केली आहे. चौघांच्या म्हणण्यानुसार, ऑक्‍टोबर-2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून श्रीगोंदे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांचा प्रचार पोटे दाम्पत्यानी केला.

राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर, त्यांनी पुन्हा कॉंग्रेसचे काम सुरू केले. वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे त्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता अधिनियमानुसार अपात्र ठरवावे. अर्हतेच्या तारखेपासून सहा वर्षांपर्यंत त्यांना अध्यक्ष, तसेच नगरसेवक राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. 

संपादन : अशोक मुरुमकर