रात्री बिबट्याची भीती, दिवसा विजेची साडेसाती!

राजेंद्र सावंत
Monday, 14 December 2020

बिबट्याच्या भीतीने वीज कंपनीला विनवणी करून शेतीपंपाला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

पाथर्डी (अहमदनगर) : बिबट्याच्या भीतीने वीज कंपनीला विनवणी करून शेतीपंपाला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वीज वितरणने सकाळी सहा ते दुपारी बारा व दुपारी बारा ते सायंकाळी सहा, अशी सहा तास वीज देण्यास सुरवात केली.

मात्र, ग्रामीण भागात चालणाऱ्या घरगुती विजेच्या शेगड्या, वाढलेल्या वीजचोरीमुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज मिळते आहे. त्यातून अनेकांचे वीजपंप जळाले. त्यामुळे "भीक नको; पण कुत्रं आवरा..' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पूर्वीप्रमाणेच दिवसा व रात्री वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बिबट्याने तालुक्‍यातील अनेक गावांत धुमाकूळ घातला. तालुक्‍यातील सुमारे 30-35 गावांत बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्याच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला. चौघे जायबंदी झाले. त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी केली. त्यानुसार, वीज वितरणने दिवसा आठ ऐवजी सहा तास वीज देण्याचेही कबुल केले. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात सकाळी सहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुसऱ्या टप्प्यात दुपारी 12 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू केला. मात्र, ग्रामीण भागात अनेकांकडे शेगड्या असल्याने सकाळी कमी दाबाने वीज मिळते. परिणामी, वीजपंप चालतच नाहीत. काही भागात दुपारीही अशीच स्थिती असते. त्यामुळे अनेकांचे वीजपंप जळाले. त्यातून पंप दुरुस्तीचा नाहक भुर्दंड सोसावा लागला. रात्री का असेना, पण पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. 

बिबट्याच्या भीतीने दिवसा वीज देण्याची मागणी केली होती. वीज कंपनीने त्यानुसार वीज दिली; मात्र ती पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे अनेक वीजपंप नादुरुस्त झाले. आर्थिक नुकसान झाले. सहा तास वीज देऊन शेतकरी कसा पाणी देणार? पाणी असुनही वीजेअभावी पिके वाया जात आहेत. त्यामुळे पूर्ण दाबाने पूर्वीप्रमाणेच रात्रीचा वीजपुरवठा करावा, असे भगवान आव्हाड यांनी सांगितले.

मोहोज देवढे, पिंपळगव्हाण, जांभळी या भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अन्य ठिकाणांहून वीजपुरवठा करता येईल का, याची तपासणी करून दोन दिवसांत निर्णय घेऊ. नवीन रोहित्र देण्याबाबत कोणतीही योजना नाही. योजना नव्याने सुरु झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेता येईल, असे वीज वितरण कपंनीचे उपअभियंता प्रशांत मोरे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for full pressure power supply for agriculture in Pathardi taluka