सदाभाऊंची रयत पोपटराव पवार-इंदोरीकरमहाराजांच्या पडली प्रेमात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी आघाडी सरकारने राज्यपालांकडे नावे पाठविली आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

नगर : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाने, राज्यपाल नियुक्त आमदार निवडीसाठी 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पाठविली आहे. त्यात राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या नावांचा समावेश आहे. 

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी आघाडी सरकारने राज्यपालांकडे नावे पाठविली आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यात आज खोत यांच्या रयत क्रांती पक्षानेही राज्यपालांना 12 नावे सुचविली आहेत. तसे पत्र राज्यपालांना पाठविले आहे.

विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्रासह समाजसेवकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देण्याची परंपरा आहे. विविध क्षेत्रांत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या 12 नावांची यादी पाठविली आहे. त्यांना आपल्या कोट्यातून आमदार करावे, अशी विनंती पत्रात केली आहे. 

रयत क्रांती पक्षाने सुचविलेल्या नावांमध्ये पोपटराव पवार, इंदोरीकर महाराज, क्रिकेटपटू जहीर खान यांचा समावेश आहे. तसेच, राज्यातील साहित्यिक विठ्ठल वाघ, विश्‍वास पाटील, प्रकाश आमटे, सत्यपाल महाराज यांचाही समावेश आहे.

संपादन - अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for making Popatrao Pawar and Indorikar Maharaj MLAs