नववी व दहावी विज्ञानचा अर्धा अभ्यासक्रम कमी करा

शांताराम काळे
Sunday, 13 December 2020

शालेय वर्ष 2020-21साठी नववी व दहावीचा विज्ञान विषयाचा 50 टक्‍के अभ्यासक्रम कमी करावा.

अकोले (अहमदनगर) : शालेय वर्ष 2020-21साठी नववी व दहावीचा विज्ञान विषयाचा 50 टक्‍के अभ्यासक्रम कमी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष दत्तात्रेय आरोटे यांनी संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडे केली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या पत्रात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून नववी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. शाळा मात्र प्रत्यक्षात सुरू होऊ शकल्या नाहीत. ऑनलाइन व ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. प्रात्यक्षिकाशिवाय विज्ञान विषयाचे अध्यापन शक्‍य होत नाही. अशा स्थितीत शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. विज्ञान महामंडळाने वेळोवेळी त्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्यामुळेच विज्ञान विषयाला सातऐवजी आठ तासिका मिळाल्या. तरीही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जादा तास घ्यावेच लागतात.

या स्थितीत वर्ग व प्रयोगशाळेशिवाय नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्‍य वाटते. यापूर्वी 25 टक्‍के अभ्यास कमी करताना ओळी / चौकटी कमी करण्याचा मार्ग अवलंबिला. अशी पद्धत न वापरता थेट प्रकरणांची संख्या कमी करावी. या दृष्टीने नववी व दहावीच्या विज्ञान विषयाचा 50 टक्‍के अभ्यासक्रम कमी करावा, अशी मागणी विज्ञान महामंडळाचे राज्याध्यक्ष दत्तात्रेय आरोटे यांनी केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for reduction of ninth and tenth science courses