गायीच्या दुधाला ३५ रुपये ‘फआरपी’ लागू करा

आनंद गायकवाड
Wednesday, 11 November 2020

शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने उसाप्रमाणेच दुधाला "एफआरपी' कायदा लागू करावा. गायीच्या दुधाला किमान 35 रुपये लिटर हमीभाव निश्‍चित करावा, अशी मागणी श्रमिक उद्योग समुहाचे संस्थापक साहेबराव नवले यांनी केले.

संगमनेर (अहमदनगर) : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने उसाप्रमाणेच दुधाला "एफआरपी' कायदा लागू करावा. गायीच्या दुधाला किमान 35 रुपये लिटर हमीभाव निश्‍चित करावा, अशी मागणी श्रमिक उद्योग समुहाचे संस्थापक साहेबराव नवले यांनी केले. 

ते म्हणाले, की ऑक्‍टोबरपासून राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करून व्यापार व उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्याने, शहरांतील व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे दुधाची मागणी व खप वाढत जाईल, या अपेक्षेने एक ऑक्‍टोबरपासून "श्रमिक'ने साडेतीन फॅट व साडेआठ एसएनएफ, या गुणप्रतीच्या दुधाला सकाळ सत्रासाठी 25 रुपये लिटर, तर सायंकाळ सत्रासाठी 26 रुपये लिटर दर देऊन दूधउत्पादकांना दिलासा दिला.

दूधउत्पादकांचे रिबेट बॅंक खात्यांवर वर्ग केले आहे. "श्रमिक'ने नियमित दूधपुरवठा करणाऱ्यांना 1 रुपये 10 पैसे लिटर रिबेट, तर एक वेळ दूधपुरवठा करणाऱ्या दूधउत्पादकांना 80 पैसे प्रतिलिटर रिबेटसह अनामत रक्कम बॅंक खात्यांवर वर्ग केली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
कोरोनापूर्वी दुधाला 32 रुपये लिटर दर देऊन दूधउत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे काम "श्रमिक'ने केले. लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. दूधभुकटी प्रकल्पधारकांनी अतिशय कमी भावाने दुधाची स्वीकृती केली. अशा प्रतिकूल परीरस्थितीत "श्रमिक'ने नियोजित वेळेत प्रत्येक दूधउत्पादकांचे पेमेंट त्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले. कोरोनाची दुसरी लाट "त्सुनामी' असू शकते. त्यामुळे गाफील न राहता, सतर्कता बाळगण्याची गरज आहे. यंदाचा दिवाळी सण साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन नवले यांनी केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Rs 35 guarantee price for milk from the government