शेवगावमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

सचिन सातपुते
Monday, 12 October 2020

शेवगाव येथील भारतीय कपास निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ (फेडरेशन) यांचे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. अनिल मडके यांनी केली.

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव येथील भारतीय कपास निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ (फेडरेशन) यांचे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. अनिल मडके यांनी केली.

याबाबत त्यांनी औरंगाबाद येथील भारतीय कपास निगमचे शाखा प्रबंधक व राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाचे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात समाधान कारक पावसामुळे यंदा जवळपास 41 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. सध्या नवीन कापसाची आवक सुरु झाल्याने बाजारात कापूस घेण्यास खाजगी व्यापा-यांनी सुरुवात केली आहे.

शेतक-यांना हमी भावाप्रमाणे कापसाला भाव मिळावा. यासाठी सी.सी.आय व फेडरेशन यांच्यामार्फत कापूस खरेदी सुरु होणे गरजेचे आहे. त्यासाठी या दोन्ही विभागाव्दारे खरेदी केंद्र सुरु करण्यात यावीत. यंदा शासनाने कापसाच्या हमी भावात वाढ केली असून त्याचा फायदा शेतक-यांना होण्यासाठी शेतकरी हिताचा विचार करुन ही खरेदी केंद्रे त्वरीत सुरु करण्यात यावीत. यासाठी बाजार समिती मार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to start a cotton procurement center in Shevgaon