अजितदादा म्हणाले, निळवंडे, राहुरी रूग्णालयाला निधी कमी पडू देणार नाही

विलास कुलकर्णी
Saturday, 30 January 2021

आज राहुरी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वांबोरी, आरडगांव, ताहाराबाद, बाभुळगाव, गणेगाव व शिरापूर (ता. पाथर्डी) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन, राहुरी खुर्द येथील वीज उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफार्मरचे लोकार्पण झाले.

राहुरी : निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी देऊ. राहुरी बस स्थानकाच्या साडेसतरा कोटी रुपयांच्या इमारतीचा प्रस्ताव माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पाठपुरावा करून पाठविला आहे. त्यासाठी येत्या वर्षभरात खर्च होईल. तेवढ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

आज राहुरी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वांबोरी, आरडगांव, ताहाराबाद, बाभुळगाव, गणेगाव व शिरापूर (ता. पाथर्डी) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन, राहुरी खुर्द येथील वीज उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफार्मरचे लोकार्पण झाले.

हेही वाचा - अण्णा शिवसेनेवर कडाडले

या वेळी मंत्री पवार बोलत होते. उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, निर्मला मालपाणी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अनुराधा आदिक, बेबी सोडनर, धनराज गाडे, अनिता पोपळघट, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, मच्छिंद्र सोनवणे, धीरज पानसंबळ, संतोष आघाव, गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डिले उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे अण्णा हजारे यांच्यावर उपोषणाची वेळ आली. त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर विश्वास ठेवला. उपोषणापासून परावृत्त झाले. परंतु, त्यांच्यावर पुन्हा अशी वेळ येऊ नये. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी कायदे मंजूर केले. त्याविरुद्ध दिल्ली येथे लाखो शेतकरी जिवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत.

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीला दुर्दैवाने हिंसक वळण मिळाले. परंतु, शेतकरी कधीही हिंसक आंदोलन करीत नाहीत. कुणीतरी गालबोट लावून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला."
"राहुरी मतदार संघातील सहा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर 19 मेगावॉट वीजनिर्मिती होऊन, 19 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल.

कोरोनामुळे मागील वर्षी विकास कामांना ब्रेक लागला. आता निधी कमी पडू देणार नाही. नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण निधी देण्यास सुरुवात होईल. राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांचे 45 हजार 706 कोटी वीजबिल थकीत आहे. नवीन ऊर्जा धोरणात थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करून राहिलेल्या बिलात 50 टक्के सवलत आहे. ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी थकबाकी भरून, सहकार्य करावे."

राज्यमंत्री तनपुरे यांची फिरकी घेतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो. तेव्हा माझ्याकडे तीन खाते होते. प्राजक्त यांना सहा खाते मिळाले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांकडे लक्ष द्यावे. निळवंडे कालव्याच्या कामांसाठी मामांच्या (जलसंपदा मंत्री जयंत पाटील) मागे लागा.

अन्यथा तुमचा मामा होईल. मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे. जिल्ह्यातील नवे चेहरे उत्साहात विकास कामे करतील. मतदारांनी त्यांना यापुढेही साथ द्यावी." असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Pawar said that Nilwande Dam, Rahuri Hospital will be funded