मंत्री गडाखांकडून विकासाचा मुद्दा, मुरकुटेंची भावनेची खेळी, तुकाराम गडाखांना ठेवायचाय विरोध जिवंत

सुनील गर्जे
Saturday, 9 January 2021

तालुक्याचे माजी आमदार संभाजी फटाके यांच्या खरवंडी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली.
 

नेवासे : तालुक्यात विद्यमान आमदार व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई व माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगाव या गावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

माजी आमदार संभाजीराव फाटके यांची खरवंडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. मात्र, सोनई व देवगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सोनई ग्रामपंचायतीने मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली गावात मोठे विकासाचे कामे केली आहेत. गडाख समर्थक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. मात्र, माजी आमदार तुकाराम गडाख यांनी 'विरोध जिवंत राहिला पाहिजे' या मुद्द्यावर स्वतः निवडणुकीत सक्रिय भाग घेत त्यांच्या पारंपारिक समर्थकांना पाठबळ देत आहे.

दरम्यान सोनईची निवडणूक मंत्री गडाख विरुद्ध माजी आमदार गडाख, मुरकुटे अशी होणार असल्याने ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चांगलीच गाजणार असल्याचे दिसते.  

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे स्वत: देवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय असून ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. मुरकटेंनी या निवडणुकीत स्वतःच्या पॅनलला 'लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे नाव देत भावनेला हात घालून मते मिळविण्याची खेळी केली. मात्र, दुसरीकडे शेवगाव-नेवासे तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'ज्ञानेश्वर' व घुले बंधूंवर केलेले विविध जाहीर आरोप घुलेंसह समर्थकांनाही खटकणारे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत गडाख-घुले समर्थक मुरकुटेंच्या विरोधात एकवटतील असे चित्र आहे.

तालुक्याच्या राजकारणात नेहमीच 'किंग मेकर' ठरलेल्या कुकाणे गावच्या ग्रामपंचायत निवडणुक माजी आमदार पांडुरंग अभंग व 'ज्ञानेश्वर'चे ज्येष्ठ संचालक ऍड. देसाई देशमुख गटाचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. या दोन्ही गटाने गडाख समर्थकांनाही संधी दिली. मात्र, ही निवडणूक मोठी चुरशीची ठरणार आहे. 

हेही वाचा - माजी आमदार कर्डिलेंना पुतण्या व व्याह्याचेच आव्हान

तालुक्याचे माजी आमदार संभाजी फटाके यांच्या खरवंडी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पिंप्री शहाली, प्रवरा संगम, चांदा, सलाबतपूर, बेल पिंपळगाव, जेऊर हैबती, तेलकुडगाव, लोहगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणूक लक्षवेधक होणार आहेत. 

बिनविरोध सात गावांची मंत्री गडाखांना साथ

नेवासे तालुक्यात होत असलेल्या 59 ग्रामपंचायतीपैकी मोरया चिंचोरे, शनी शिंगणापूर, खरवंडी, देवसडे, वाटापूर, मंगळापूर व वांजोळी ही सात गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींवर मंत्री शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development issue from Minister Gadakh, Murkute's emotional game