गावकीचं इलेक्शन ः माजी आमदार कर्डिलेंची शिवसेनेतील व्याह्यांसोबतच फाइट

दत्ता इंगळे
Saturday, 9 January 2021

हे दोन्ही नेते एकमेकांचे व्याही आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते, अशी कर्डिले यांच्याविरुद्ध लढत रंगणार आहे.

नगर तालुका ः ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने तालुक्‍यात चांगलाच वेग घेतला आहे. भाजपचे नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते, त्यांचे गाव असलेल्या बुऱ्हाणनगरमध्ये प्रचाराचा प्रारंभ झाला, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नगर तालुक्‍यातील मांजरसुंबे येथून महाविकास आघाडीचे नेतृत्व करीत प्रचारास सुरवात केली.

हे दोन्ही नेते एकमेकांचे व्याही आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते, अशी कर्डिले यांच्याविरुद्ध लढत रंगणार आहे.

प्रा. गाडे तालुक्‍यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांची मोट बांधण्यात व्यग्र आहेत. कर्डिले व गाडे या दोघांचीही नगर तालुक्‍यातील गावांवर पकड आहे.

विशेष म्हणजे, कर्डिले यांची कन्या प्रा. शशिकांत गाडे यांच्या पुतण्यास दिली असल्याने, हे दोन्ही नेते एकमेकांचे व्याही आहेत. मात्र, तालुक्‍याच्या राजकारणातील या दोघांचे विळ्या- भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे तालुक्‍यात या व्याह्यांची जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे. 

भारतीय जनता पक्षाने शिवाजी कर्डिले यांच्या मदतीसाठी नेत्यांची फौज उभी केली आहे. प्रा. गाडेही शिवसेनेच्या, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्यांसह प्रचारासाठी नियोजन करीत आहेत. 

कर्डिले यांनी जेऊर, निंबळक, नागरदेवळे जिल्हा परिषद गटांतील कार्यकर्त्यांसह बाजार समिती, तसेच खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामात आपापल्या भागात प्रयत्न करण्याचे सांगत नियोजन केले आहे. प्रा. शशिकांत गाडे यांनी दरेवाडी, देहरे, गुंडेगाव, जिल्हा परिषद गटांतील कार्यकर्त्यांसह पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे शाखाप्रमुख यांच्या बैठका घेतल्या आहेत. 

हेही वाचा - पॅनल प्रमुखांना अपक्षांचा वाटतोय धोका

तालुक्‍यातील जेऊर, पिंपळगाव माळवी, चिचोंडी पाटील, वाळकी, रुईछत्तिशी, निंबळक, देहरे या मोठ्या ग्रामपंचायतींच्या प्रचारात या दोन्ही व्याह्यांची जुगलबंदी रंगणार असल्याची तालुक्‍यातील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

अपक्षांचा सर्वांनीच घेतला धसका 

नगर तालुक्‍यात गावागावांतून पॅनल तयार झाली आहेत. बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी जाहीर केलेल्या युवा उमेदवारांचा पॅनलप्रमुख व तालुक्‍यातील नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. ग्रामपंचायतीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व असते. त्यामुळे अपक्षांचा आपल्या पॅनलला फटका बसू नये, यासाठी परस्परांविरोधात उभ्या ठाकलेल्या दोन्ही पॅनलसह तालुक्‍यातील नेते गावकीचे राजकारण जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Kardilen's fight with Shashikant Gade