जामखेडच्या सभापती निवडीचा पुन्हा पेच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद यापूर्वी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र, या प्रवर्गातून सभापतीपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यावेळी ही निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नव्हती.

जामखेड :जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता. 3) रोजी पूर्ण होणार आहे. मात्र, ही निवड पुढील आदेश येईपर्यंत जाहीर करू नये, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद यापूर्वी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र, या प्रवर्गातून सभापतीपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यावेळी ही निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाच महिन्यानंतर जिल्हाधिकार्यांनी जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नव्याने सर्वसाधारण स्री हे आरक्षण काढले.

हेही वाचा - याला म्हणतात डेरिंग...स्वतःचाच परस्पर वाढवला पगार

जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र, या आरक्षणाला हरकत घेत,
पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ. भगवान मुरूमकर यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली.

त्यानुसार न्यायालयाने जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद पुढील आदेश येईपर्यंत जाहीर करू नये, असे निर्देश दिल्यामुळे उद्या शुक्रवार (ता. 3 ) रोजी पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र सभापतीपद जाहीर होणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulty again in Jamkhed over Speaker election