esakal | ऊसतोड कामगारसंघटनांत तीन तिघाडा, काम बिघाडा
sakal

बोलून बातमी शोधा

Disagreement among sugarcane workers

मराठवाडा, नगर, धुळे, वाशीम, पुसद भागातील ऊसतोडणी मजुरांनी घर सोडलेले नाही. योग्य दरवाढ झाल्याशिवाय घर सोडणार नाही. सरकारने अंत पाहू नये. योग्य दरवाढ द्यावी. त्याशिवाय संप मिटणार नाही, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. 

ऊसतोड कामगारसंघटनांत तीन तिघाडा, काम बिघाडा

sakal_logo
By
सूर्यकांत नेटके

नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या दरात वाढ करावी, यासह अन्य मागण्यांसाठी यंदा ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. दरवाढीवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी साखर संघाच्या कार्यालयात मजूर प्रतिनिधींसोबत बैठक झाली. मात्र, त्यातही तोडगा निघाला नाही.

यंदाच्या संपानंतरची ही चौथी बैठक होती. सर्व संघटनांनी एकमत करून दराबाबत बोलणी करावी, असे आवाहन साखर संघाने केले. मात्र, दराबाबत संघटनांमध्येच एकमत होत नसल्याचे दिसून आले. यंदा गाळपासाठी ऊस अधिक असल्याने, हंगाम लांबण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. 

दरम्यान, दसऱ्यानंतर दोन-तीन दिवसांत संपावर तोडगा निघण्याची शक्‍यता व्यक्त होत असली, तरी साखर संघ केवळ बैठका घेऊन संप मोडीत काढण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. 

ऊसतोड कामगारांच्या दराचा करार संपल्याने दरात दुप्पट वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्येही वाढ करावी, लवादाचा करार पाचऐवजी तीन वर्षांचा करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी यंदा ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे.

संपावर तोडगा निघावा, यासाठी नुकतीच साखर संघाच्या कार्यालयात साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. साखर संघाच्या संचालकांसह ऊसतोडणी कामगार संघटनांचे नेते गहिनीनाथ थोरे पाटील, प्रदीप भांगे, प्रा. सुशीला मोराळे, मोहन जाधव, दत्तू भांगे, श्रीमंत जायभाये आदी उपस्थित होते. 

संपाबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी ही चौथी बैठक होती. दसऱ्यानंतर दोन दिवसांत तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल; मात्र मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे थोरे यांनी सांगितले. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संपावर तोडगा काढावा, अशी मागणी असल्याने, मजूर आणि कारखानदार अशा दोघांचेही पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 

मराठवाडा, नगर, धुळे, वाशीम, पुसद भागातील ऊसतोडणी मजुरांनी घर सोडलेले नाही. योग्य दरवाढ झाल्याशिवाय घर सोडणार नाही. सरकारने अंत पाहू नये. योग्य दरवाढ द्यावी. त्याशिवाय संप मिटणार नाही, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. 

तोडगा निघेपर्यंत संप कायम 
बैठकीत ऊसतोडणी मजुरांच्या दरवाढीसह इतर मागण्यांवर चर्चा झाली. दरवाढीबाबत प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींनी वेगवेगळी मागणी केली. सर्व संघटनांनी दराबाबत एकमत करून मागणी करावी, असे आवाहन साखर संघाने केले. मात्र, बैठकीत दराबाबत एकमत झाले नाही. पुरेशी दरवाढ झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे गहिनीनाथ थोरे व इतर संघटनांनी स्पष्ट केले. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image