श्रीगोंदा युवक काँग्रेसमध्ये धुसफूस, अजूनही विखे गटाकडून थोरात गटावर कुरघोडी

संजय आ. काटे
Thursday, 10 September 2020

काल युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यात महसूलमंत्री थोरात यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवण्यात आले. अथवा त्यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरवली.

श्रीगोंदे: तालुक्‍यात युवक कॉंग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काल झालेल्या केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलावलेच नाही. त्यातच आता दोन्ही बाजूंनी खुलेआम विरोधी प्रतिक्रिया येत असल्याने जुन्या विखेपाटील गटाची तालुक्‍यात युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून असणारी ताकत कायम आहे. त्याला खतपाणी नेमके कुणाचे यावरून खलबते सुरू होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जिल्हा युवक कॉंग्रेसची जुळवणी सुरू आहे. त्यासाठी नव्या नियुक्‍त्या होण्याची शक्‍यता असल्याने तालुक्‍यातील कॉंग्रेसची युवकांची फळी कामाला लागली आहे. राज्यात त्यांचेच सरकार असल्याने आता केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले जात आहे. तर काही नेते संघटन बळकटीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, यातून आता गटबाजी समोर येत आहे. ती पक्षाला घातक मानली जाते. 

हेही वाचा - आदिवासी मुलांना मुदत संपलेले दूध

काल युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यात महसूलमंत्री थोरात यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवण्यात आले. अथवा त्यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरवली. युवकचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले हे माजी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे खंद्दे समर्थक मानले जात होते. मात्र, ते त्यांच्यासोबत भाजपात न जाता कॉंग्रेसमध्येच थांबले. आता त्यांच्या माध्यमातून तालुक्‍यात युवक कॉंग्रेस सक्रिय झाली आहे. कालचे आंदोलन त्याचाच भाग होता. मात्र, या आंदोलनात श्रीगोंदे, कर्जत व पारनेरचे समन्वयक असणारे स्मितल वाबळे यांना बाजूला ठेवण्यात आले. त्यावरूनच सध्या युवक कॉंग्रेसमध्ये गटबाजीची ठिणगी पडण्याचे चिन्हे आहेत. 

आधी विखेसमर्थक होतो आता थोरातांना मानतो 
युवक कॉंग्रेसमध्ये समन्वयक हे पद आहे की नाही याबद्दल शंका आहे. त्यांची नेमणूक कुणी केली याची माहिती नाही. अधिकृत पदे ही आमच्याकडे आहेत. शिवाय मी पूर्वी विखेपाटील यांना मानत होतो. मात्र, आता मंत्री थोरात यांना मानणारा कार्यकर्ता आहे. तेच आमचे नेते आहेत. ज्यांना पक्षीय निवडणुकीत बोटावर मोजण्याएवढी मते मिळाली, ते कसे नेते होणार? तरीही आमचे स्थानिक कार्यकर्ते त्यांना कार्यक्रमांना निरोप देतात. मात्र, ते येत नाहीत. 
- हेमंत ओगले, कॉंग्रेस पदाधिकारी. 

त्यांची पक्षनिष्ठा तपासली पाहिजे 
ज्यांना पक्षाची विधानसभेला उमेदवारी असतानाही अनामत रक्कमही वाचविता आली नाही. त्यांनी आमची लायकी न तपासलेलीच बरी. माझे समन्वयक हे पद प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केले आहे. जे सध्या कॉंग्रेस व थोरात यांचे असल्याचे सांगत आहेत. त्यांचा भुतकाळासह वर्तमानकाळही तपासला जावा. 
- स्मितल वाबळे, समन्वयक, युवक कॉंग्रेस. 
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disagreement in Shrigonda Youth Congress