
अहमदनगर शहरातील अनधिकृत नळजोड तोडा
अहमदनगर - शहरातील अनधिकृत नळजोडांची सात दिवसांत माहिती घेऊन ते तोडण्याची मोहीम राबवा. कारवाईत कोणी अडथळा आणत असेल, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यामुळे अनधिकृत नळजोडधारकांचे धाबे दणाणले आहेत.
आयुक्त डॉ. जावळे यांनी सोमवारी (ता. एक) सायंकाळी उशिरा पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. जावळे म्हणाले, की ‘निरंतर सेवा’ हे महानगरपालिकेचे ब्रीद असून, त्याप्रमाणे नगरकरांना सेवा द्यायची आहे. त्यानुसार उपयोजना होणे गरजेचे आहे. संपूर्ण नगर शहराला दिवसाआड पाणी देण्यासाठी योग्य नियोजन करा. अनधिकृत नळजोड शोधून त्याबाबतचा अहवाल सात दिवसांत सादर करा. त्यानंतर ते तोडण्याची मोहीम राबवा, असे आदेश डॉ. जावळे यांनी दिले. नगर शहर पूर्णपणे टँकरमुक्त करायचे आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने चोखपणे काम करावे.
कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जावळे यांनी दिला. त्याचबरोबर, नगरकरांनी फेज-टू पाणीयोजनेचे नळजोड घेण्यासाठी सहकार्य करावे, जेणेकरून स्वच्छ व पूर्ण दाबाने त्यांना पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठ्याचा खर्च व वसुलीमध्ये मोठी तफावत आहे. त्यासाठी नागरिकांनी पाणीपट्टी भरावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
...तर गुन्हा दाखल करा
कोणालाही घाबरायचे कारण नाही. जे कोणी मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अमृत पाणीयोजनेचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून फेज-टू पाणीयोजना संपूर्ण शहरात कार्यान्वित करा व जुन्या जलवाहिन्या बंद करा, अशा सूचना आयुक्त जावळे यांनी बैठकीत दिल्या.
ते एक हजार नळजोड नियमित करा
मुकुंदनगर भागात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी फेज-टू पाणीयोजना कार्यान्वित करा. या भागात सुमारे एक हजार नळजोड अनधिकृत आहेत. ते नियमित करून घ्यावेत. ते नियमित न केल्यास तोडण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश जावळे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.
Web Title: Disconnect Unauthorized Taps In Ahmednagar City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..