संगमनेर पीआयच्या तडकाफडकी बदलीचे गुपित उकललं, पदभारही सोपवला मध्यरात्री!

आनंद गायकवाड
Monday, 2 November 2020

तालुका पोलिस ठाण्याचा पदभार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांच्याकडे सोपवण्याचे व त्यांना नगरच्या मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

संगमनेर ः नगर जिल्ह्यात सध्या पोलिसांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. काही बदल्या बेमोसम होत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणी कोठे सेटिंग लावली. कोण कोणाच्या वशिल्याने आले, याविषयी कुजबुज सुरू आहे. चार दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या क्लिपमुळे हे वातावरण तापले आहे.

संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांना नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या शासकीय हालचालीनंतर पोलिस ठाण्याची कार्यभार संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना सोपवण्यात आला आहे. या तडकाफडकी कारवाईची चर्चा पोलिस दल व तालुक्यात होत आहे.

संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका मिसिंगप्रकरणी शुक्रवारी रात्री केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला.

तालुका पोलिस ठाण्याचा पदभार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांच्याकडे सोपवण्याचे व त्यांना नगरच्या मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. त्यानुसार पोलिस निरीक्षक परमार यांनी मध्यरात्रीच तालुका पोलिस ठाण्याचा पदभार हाती घेतला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion on police transfers in Nagar district